शकुंतला गॅम्लिन यांच्या प्रभारी मुख्य सचिवपदी नेमणुकीच्या मुद्दय़ावर आम आदमी पक्ष दिल्लीत ‘हेतुपुरस्सर’ घटनात्मक संकट निर्माण करत असल्याचा आरोप करतानाच, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि वाद हे ‘एक दुजे के लिए’ असे समीकरण असल्याची कोपरखळी भाजपने मारली आहे.
अरविंद केजरीवाल हे आता ‘काँट्रॉव्हर्सिवाल’ पासून ‘नौटंकीवाल’ झाले आहेत, असे एका माध्यम कार्यशाळेत भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना संसदीय कार्य राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले.
‘आप’मधील अंतर्गत संघर्ष आणि दिल्ली सरकारमधील मंत्र्यांबाबतचे भांडण यासह अलीकडेच या पक्षासंदर्भात उद्भवलेल्या वादांचा संदर्भ देऊन, केजरीवाल यांच्या नेतृत्वातील हा पक्ष वादविवादात राहू इच्छितो, असा टोला नक्वी यांनी हाणला. ‘वादामागून वाद.. आणि आता अंतिमत: जंग यांच्याशी ‘जंग’. आपचे नेते वादात अडकून राहू इच्छितात, हीच समस्या आहे,’’ असे नक्वी म्हणाले. पूर्वी ‘आप’ हा धरणे देणारा, विरोध करणारा नाटकबाज पक्ष होता.. आणि आता तो वादग्रस्त पक्ष झाल्याची टीका केली.
‘बदली उद्योग’ थांबवण्याचा प्रयत्न -शिसोदिया
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीवरून दिल्ली सरकारविरुद्ध नायब राज्यपालांच्या सुरू असलेला वाद थांबण्याची चिन्हे नाहीत. दिल्लीत आम आदमी पक्षाच्या सरकारने काही अधिकारी चालवत असलेला ‘बदल्यांचा उद्योग’ थांबवण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी केला. या उद्योगातून हे अधिकारी कोटय़वधींची कमाई करत होते, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळेच सरकारला विरोध सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.