गडकरींकडे नागपूर, गोयलांकडे मुंबई, जावडेकरांकडे दिल्लीची जबाबदारी

नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल विरोधक लोकांची दिशाभूल करत असल्याचा दावा करत भाजपने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. दिल्लीत रविवारी (५ जानेवारी) त्याची सुरुवात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा करतील. ‘जनजागृती’अंतर्गत तीन कोटी कुटुंबांच्या घरी जाऊन कायद्याची माहिती दिली जाईल.

या मोहिमेची जबाबदारी प्रामुख्याने मोदी सरकारमधील ३५ कॅबिनेट व राज्यमंत्र्यांकडे सोपवण्यात आली असून या मंत्र्यांनी किमान दहा घरांमध्ये व्यक्तिश: जाऊन कायद्याची सकारात्मक बाजू मांडण्यास सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रात ही जबाबदारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पीयूष गोयल यांच्यावर अनुक्रमे नागपूर व मुंबई असेल. प्रत्येक राज्यासाठी केंद्रातील किमान दोन मंत्री जनजागृती करतील.

या शिवाय, संवाद कार्यक्रमात राज्यांमधील प्रत्येक जिल्ह्य़ांमध्ये प्रदेश भाजपचे नेते जाहीर सभा घेतील तसेच, एक लाख कोपरा सभा घेतल्या जातील. विशेष सामाजिक संपर्क कार्यक्रमात व्यावसायिक, खेळाडू, युवा, दलित व महिला यांच्याशी संपर्क साधला जाईल. समाजमाध्यमातून प्रचाराचा मारा केला जाणार आहे तसेच, भाजपचे नेते देशभर २५० पत्रकार परिषदा घेतील. भाजपने या जंगी मोहिमेची शुक्रवारी अधिकृतपणे घोषणा केली असली तरी सोमवारपासूनच ही मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेत प्रदेश स्तरावर भाजपचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, प्रमुख नेता तसेच, खासदार, आमदार सहभागी होतील. देशभरातील दहा लाख कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे.

३० जंगी सभा

गेल्या आठवडय़ात अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि राष्ट्रीय संघटक बी. एल. संतोष यांच्या बैठकीत या मोहिमेला अंतिम रूप देण्यात आले होते. या मोहिमेअंतर्गत ३० जंगी जाहीर सभाही घेण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात शहा यांनी शुक्रवारी राजस्थानमध्ये जोधपूरमधील जाहीर सभेने केली. जोधपूरमध्ये २५ हजार पाकिस्तानी अल्पसंख्य निर्वासित आहेत.