लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला आला आहे. भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वपक्षाला इशारा देत राम मंदिर उभा राहिले नाही तर भाजपाचा विजय कठीण असेल, असे म्हटले आहे.

ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात जमिनीचा मालक कोण आहे, यावर सुनावणी सुरू आहे. हेच मी पंतप्रधान मोदींना सांगू इच्छितो. घटनेनुसार सरकार सर्वोच्च आहे. त्यांनी जर एखादी जमीन घेतली तर त्यांना भरपाई द्यावी लागते. मला वाटतं, सरकारने त्यांना भरपाई देण्याचा निर्णय घ्यावा आणि न्यायालयाने १० वर्षे, २० वर्षांत निर्णय घेऊ असे सांगावे. आम्हाला याबाबत कोणताच आक्षेप नाही. पण जमीन आमची आहे, सरकारची आहे.

जेव्हा तुम्ही जमीन कोणाची आहे हा निर्णय द्याल तर बाजारभावानुसार त्याची किंमत आम्ही देऊ. राम मंदिर उभा राहिले तर महाआघाडीला पाच जागाही मिळणार नाही. भाजपाच्या खात्यात ७५ जागा येतील. मंदिर उभा न राहिल्यास पक्षाचे मोठे नुकसान होईल. कार्यकर्त्यांचा उत्साह मावळेल. लोक शिव्याशाप देतील. मंदिर न उभारता निवडणुकीला सामोरे जाणे म्हणजे आत्महत्या ठरेल, असे ते म्हणाले.

दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही रविवारी भाजपावर राम मंदिरावरून निशाणा साधला. राम मंदिर हा भाजपासाठी जुमला असल्याचे ते म्हणाले. जर न्यायालयाच राम मंदिराचा निर्णय घेणार असेल तर तुम्ही तुमच्या निवडणूक जाहीरनाम्यात राम मंदिर उभारणीचे आश्वासन का देता असा सवाल उपस्थित केला.