भाजपा २०१४ मध्ये मिळालेल्या जागांपेक्षा जास्त जागा जिंकत पुनरागमन करेल असा विश्वास भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपा आत्मपरिक्षण करत असून, विरोधकांचा आत्मविश्वास उंचावला आहे. ‘निवडणुका अजून लांब आहेत, पण मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगू शकतो की एनडीए आणि भाजपाला २०१४ पेक्षाही जास्त जागा मिळतील आणि पुन्हा एकदा आम्ही सरकार स्थापन करु’, असं अमित शहा बोलले आहेत. टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा यांनी हे वक्तव्य केलं.

गोरखपूर आणि फुलपूर पोटनिवडणुकीत सपा-बसपा युतीने केलेल्या पराभवानंतर पहिल्यांदाच मुलाखत देणा-या अमित शहा यांनी यावेळी सांगितलं की, ‘पक्षाने हा पराभव गांभीर्याने घेतला असून, कारणे शोधली जात आहे. मात्र याचा परिणाम निवडणुकीवर होणार नाही. उत्तर प्रदेश किंवा देशभरातील कौल एकच असेल’.

सोहराबुद्दीन प्रकरणात न्यायालयाने सुटका केली असतानाही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी त्यांचा हत्या आरोपी म्हणून उल्लेख करत असल्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘माझी फक्त निर्दोष सुटका करण्यात आलेली नसून, माझ्याविरोधात कोणताही गुन्हा नोंद नाही. निकालात राजकीय फायद्यापोटी माझ्यावर आरोप करण्यात आल्याचं स्पष्ट सांगण्यात आलं आहे’. यावेळी त्यांनी राहुल गांधींनी काँग्रेस अधिवेशनात पंतप्रधान मोदींवर वैयक्तित टीका केलेल्या भाषणामुळे नवीन पर्वाला सुरुवात होईल ही शक्यता नाकारली.

‘काँग्रेस अध्यक्ष राजकारणात नवीन पर्व सुरु करतील असं मला खरंच वाटत नाही. देशाने आधीच एका राजकीय पर्वाची निवड केली आहे. या देशाला आता जातीचं, वंशावळीचं राजकारण नको आहे. आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्तावाखाली कामगिरी करुन दाखवण्याचं राजकारण सुरु झालं आहे. राहुल गांधी काय बोलतात याच्याने फरक पडत नाही, हे पर्व बदलणार नाही’, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.

यावेळी अमित शहा यांनी २०१९ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातूनच निवडणूक लढतील अशी माहिती दिली. ‘हो ते वाराणसी मतदारसंघातूनच लढतील. दुस-या मतदारसंघातून लढण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्याच बहुमताने ते पुन्हा एकदा निवडून येतील’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.