संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारला काळ्या पैशांच्या प्रश्नावरून लक्ष्य केले. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने या प्रश्नावर दिलेल्या आश्वासनाचे काय झाले, असा सवाल विरोधकांनी केल्याने संसदेत गदारोळ माजला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज काही वेळासाठी तहकूब करावे लागले. अखेर या प्रश्नावर चर्चा करण्यात येईल, असे सरकारने स्पष्ट केले.
कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राजद, सपा आणि आपच्या सदस्यांनी सभागृहातील मोकळ्या जागेत धाव घेतली. १०० दिवस उलटून गेले आहेत, काळ्या पैशांचे काय झाले, अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. लोकसभेत विरोधकांनी काळा पैसा परत आणा, अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. तरीही त्याकडे दुर्लक्ष करीत अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी शून्य प्रहराला कामकाज पुकारले.
सरकारने १०० दिवसांत काळा पैसा आणण्याचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले, असा सवाल विरोधकांनी केला. विविध राजकीय पक्षांशी चर्चा करून या प्रश्नावर लवकरच चर्चा करण्यात येईल, असे महाजन यांनी स्पष्ट करून सदस्यांना शांत राहण्याची सूचना केली. मात्र विरोधक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. राज्यसभेतही जद(यू), सपा आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी घोषणा देत फलक फडकाविले.

कुठे आहे काळा पैसा- मुलायम
नवी दिल्ली : सत्तेवर आल्यानंतर १०० दिवसांच्या कालावधीत परदेशातील काळा पैसा भारतात आणण्याचे दिलेले आश्वासन पाळण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार अपयशी ठरल्याची टीका सपाचे नेते मुलायमसिंह यांनी केली आहे.सरकारने १०० दिवसांत काळा पैसा भारतात आणण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात सहा महिने उलटून गेले आहेत, काळा पैसा कोठे आहे,
असा सवाल मुलायमसिंह यांनी केला. परदेशातून आणण्यात आलेल्या काळ्या पैशांचा वापर विकासकामांसाठी केला जाईल, असेही मोदी म्हणाले होते, असेही मुलायमसिंह म्हणाले.
यूपीए सरकारने परदेशात किती काळा पैसा आहे त्याची किमान आकडेवारी तरी दिली होती, परंतु एनडीए सरकार ती आकडेवारीही देत नाही. कटकारस्थान रचून काळ्या पैशांची विल्हेवाट लावण्यात आली आहे, अनेक खात्यांमध्ये शिल्लकच नसल्याचे दिसत आहे, असेही मुलायमसिंह म्हणाले.

काँग्रेस, विरोधकांकडून काळा पैसाधारकांना मदत – जावडेकर
नवी दिल्ली : काळ्या पैशांच्या प्रश्नावरून ज्यांनी सध्या गदारोळ माजविला आहे तेच परदेशातील खात्यांमध्ये काळा पैसा ठेवणाऱ्यांना मदत करीत आहेत, असा हल्ला सरकारने मंगळवारी काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांवर चढविला.परदेशातील खात्यांमध्ये दडवून ठेवलेला काळा पैसा परत आणण्यासाठी भाजपच्या सरकारने पावले उचलली आहेत, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी संसदेबाहेर वार्ताहरांना सांगितले. या प्रश्नावरून सध्या जे गदारोळ माजवीत आहेत ते आणि काँग्रेस पक्ष परदेशात काळा पैसा असलेल्यांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले असतानाही यूपीए सरकारने अडीच वर्षे विशेष तपास पथक स्थापन केले नाही, मात्र भाजपच्या सरकारने सत्तेवर येताच अडीच दिवसांतच पथकाची स्थापना केली, असेही जावडेकर म्हणाले.