२३ जण मृत्युमुखी, ५५ जखमी
पराछिनारच्या कपडा बाजारात रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटात २३ जणांचा मृत्यू झाला असून, ५५ जण जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले.
पराछिनार शहरात हा जुन्या कपडय़ांचा बाजार आहे. बोचऱ्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी रविवारी कपडे खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी उसळली होती. त्या वेळी झालेल्या बॉम्बस्फोटात किमान २३ जणांचा मृत्यू झाला. या स्फोटात ५५ हून अधिक जखमी झाले आहेत, असे कुरामचे राजकीय प्रशासक अमजद अली खान यांनी सांगितले.
पोलिसांनी घटनास्थळाहून दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच परिसरात नाकेबंदी करण्यात आली असून, पुरावे गोळा करण्यात येत आहेत. कपडय़ाच्या गाठोडय़ात हा बॉम्ब लपवण्यात आला होता, असे पोलिसांनी सांगितले.
स्फोटातील २३ गंभीर जखमींना लष्करी जवानांनी दोन हेलिकॉप्टरमधून पेशावरमधील रुग्णालयांत नेले. स्फोटातील जखमींपैकी बहुतेकांची प्रकृती गंभीर असून, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पराछिनारमधील सर्व रूणालयांत आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. तसेच स्फोटाचे स्वरूपही अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पराछिनार शहर उत्तर वजिरिस्तानजवळ असून तेथे प्रशासकीय मुख्यालय आहे.
या शहरातील या कपडा बाजारात रविवारी मोठी गर्दी उसळते. या शहराची लोकसंख्या सुमारे ४० हजार आहे. पराछिनार परिसरात पाकिस्तानी तालिबान आणि इतर दहशतवादी संघटनांविरोधात जर्ब-ए-अज्ब मोहीम सुरू आहे.