सात आश्चर्यापकी एक असलेले पिरॅमिड, हजारो वर्षे जतन करून ठेवलेल्या ममीज, जगातील सर्वात लांब नदी नाईल, जगप्रसिद्ध सुएझ कालवा, महाराणी क्लिओपात्रा.. जगात इजिप्तची ओळख आहे ती अशी. मात्र, सध्या इजिप्तमध्ये सुरू असलेले रक्तलांछित सत्ताकारण, दडपशाही, रक्तपात यांमुळे या देशाची नवीच ओळख निर्माण होत आहे. लोकशाही मार्गाने निवडून आलेले इजिप्तचे अध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांचे समर्थक आणि पोलीस यांच्यात उसळलेल्या रक्तरंजित संघर्षांत तब्बल ८०० जणांना प्राण गमवावे लागले. वास्तविक ३० वर्षांची मुबारकशाही संपल्यानंतर मोर्सी हे इजिप्तमध्ये लोकशाही आणून देशाला प्रगतीची वाट दाखवतील, अशी तेथील नागरिकांना आशा होती. मात्र, मोर्सी यांनी मुबारक यांचाच कित्ता गिरवत लोकशाहीच्या पडद्याआड एकाधिकारशाहीच चालवली होती. जेमतेम एक वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी इजिप्शियन जनतेला केवळ लोकशाहीचे मृगजळच दाखवले..
सत्तासंघर्षांची बिजे :
इजिप्तमध्ये सत्तासंघर्षांला सुरुवात झाली ती होस्नी मुबारक यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळलेल्या जनतेने गेल्या वर्षी राष्ट्रीय उठाव केल्यानंतर. इजिप्तचे तिसरे अध्यक्ष अन्वर अल-सादात यांची तेथील लष्कराने हत्या केल्यानंतर देशात स्थर्य आणण्याचे आश्वासन देत १४ ऑक्टोबर १९८१मध्ये मुबारक यांनी इजिप्तच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. त्यानंतर तब्बल ३० वष्रे अध्यक्षपदी ठाण मांडलेल्या मुबारक यांनी मनमानी कारभार करत दडपशाही केली.
लोकभावनेला कस्पटासमान लेखणाऱ्या या बलाढय़ सत्ताधाऱ्याने जनतेचा रोष ओढवून घेतला. त्यामुळे २०११ मध्ये त्यांच्याविरोधात प्रचंड जनक्षोभ उसळला. मुबारक यांच्याविरोधात इजिप्शियन जनता कैरोमधील ताहरीर चौकात जमली. १८ दिवसांच्या आंदोलनानंतर मुबारक यांना अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले आणि ३० वर्षांच्या एकाधिकारशाहीचा अंत झाला.  
मोर्सीची कारकीर्द :
मुबारक पायउतार झाल्यानंतर मे, २०१२मध्ये निवडणुका झाल्या आणि मोहम्मद मोर्सी अध्यक्षपदी निवडून आले. मुबारक यांच्या दडपशाहीला कंटाळलेल्या इजिप्तच्या जनतेला मोर्सी लोकशाहीचा चंद्र दाखवतील, अशी आशा होती. मात्र ती फोल ठरली. लोकशाहीचा बुरखा पांघरून मोर्सी यांनीही एकाधिकारशाहीच सुरू केली. महागाई, भ्रष्टाचार आणि बेकारी यांनी पिचलेल्या जनतेला मोर्सी यांनी प्रगतीचा कोणताही मार्ग दाखवला नाही. त्यामुळे मोर्सी यांच्याविरोधातही लोकाक्षोभ उसळला. त्याची दखल घेत लष्कराने मोर्सी यांना पदच्युत केले आणि देशाची सूत्रे सरन्यायाधीशांकडे सोपवली.
मोर्सी समर्थक व लष्कर यांच्यातील संघर्ष :
मोर्सी यांना पदच्युत केल्यानंतर लवकरच सार्वत्रिक निवडणुका होऊन नवा अध्यक्ष सत्तेची खुर्ची सांभाळेल, अशी आशा असतानाच मोर्सी समर्थक आणि लष्करामध्ये रक्तरंजित संघर्ष सुरू झाला. मोर्सी यांना हटवण्यास त्याच्या मुस्लिम ब्रदरहूड पक्षाने जोरदार विरोध केला असून, लष्कराविरोधात त्यांनी अघोषित युद्ध छेडले आहे. या विरोधाची धार कायम करण्यासाठी त्यांनी कैरोजवळील नस्र या ठिकाणी काही छावण्या उभारल्या. हे आंदोलन दडपण्यासाठी लष्करानेही कैरोमध्ये ठिकठिकाणी चौक्या उभारल्या. मोर्सी समर्थकांच्या छावण्या उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी गोळीबार करत या छावण्यांवरून बुलडोझर फिरवले. त्यात ८०० जणांचा मृत्यू झाला, तर साडेतीन हजारपेक्षा अधिक नागरिक जखमी झाले.
संकलन : संदीप नलावडे

मोर्सी : अध्यक्षीय प्रासाद ते तुरुंगवास
*११ फेब्रुवारी २०११ : जनतेने होस्नी मुबारक यांना सत्तेतून खाली उतरवले.
*मे, २०१२ : इजिप्तमध्ये सार्वत्रिक निवडणुका होऊन मोहम्मद मोर्सी यांची अध्यक्षपदी नियुक्ती
*३० जून २०१२ : मोर्सीनी अध्यक्षपदाची शपथ घेतली.
*२२ नोव्हेंबर २०१२ : मोर्सी यांनी सर्व सत्ता आपल्या एकाधिकाराखाली आणली. संसद विसर्जति करण्याचा आणि आपल्या निर्णयाची न्यायालयीन पडताळणी करण्याचा अधिकारही न्यायालयाला दिला नाही.
*४ डिसेंबर २०१२ : देशाची राज्यघटना पुन्हा लिहिली जावी यासाठी अध्यक्षांच्या निवासस्थानासमोर तब्बल एक लाख लोकांनी आंदोलन केले. आंदोलन दडपण्यासाठी सरकारने गोळीबाराचे आदेश दिले. त्यात १० जणांचा मृत्यू.
*२५ जानेवारी २०१३ : इजिप्शियन जनतेने ताहरीर चौकात जमून मोर्सी यांच्याविरोधात उठाव केला.
*फेब्रुवारी-मार्च २०१३ : जनतेचा रोष अनेक शहरांत पोहोचला. यात अनेकांना जीव गमवावा लागला.
*३० जून २०१३ : मोर्सी यांच्याविरोधात लाखो लोक रस्त्यावर उतरले. मोर्सीनी पदत्याग करून निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली.
*३ जुल २०१३ : मोर्सी यांना दिलेली मुदत संपल्यानंतर लष्कराने मोदींना पदच्युत केले आणि सत्ता ताब्यात घेतली.

मोर्सी यांचे काय चुकले?
मुबारकशाही उलथवून टाकत इजिप्तच्या सत्तेची सूत्रे हाती घेणाऱ्या मोर्सी यांना जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात पूर्णपणे अपयश आले. देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा यशस्वीपणे आखण्यात ते अपयशी ठरलेच, पण तेथील संसदेत विधेयक संमत करून त्यांनी अर्निबध सत्तेचे अधिकार स्वत:कडे घेतले. संसद विसर्जति करण्याचा अधिकार न्यायालयाला देण्यासही त्यांनी नकार दिला. म्हणजेच त्यांची लोकशाही आडून असलेली हुकूमशाहीच इजिप्तच्या जनतेने अनुभवली. सुरक्षा व्यवस्थेतही मोर्सी सरकार गंभीर नसल्याचा आरोप जनतेने केला.

इजिप्तसमोरील आव्हाने
जनआंदोलनानंतर इजिप्तमधील लोकशाही मार्गाने निवडून आलेले मोर्सी सरकार बरखास्त करून लष्कराने सत्ता हाती घेतली, तरी इजिप्तच्या भवितव्याच्या दृष्टीने ही फारशी चांगली गोष्ट घडलेली नाही. ३०पेक्षा अधिक वष्रे लोकशाहीपासून दूर राहणाऱ्या या देशातील सत्ताधारी लोकशाही कशी राबवायची, याबाबत मात्र अज्ञानी आहेत. सहा महिन्यांनंतर येथे पुन्हा निवडणुका होतील, अशी घोषणा लष्कराने केली असली, तरी त्यानंतर येणारे सरकार एकाधिकारशाही राबवणार नाही, याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. नव्या सरकारला देशाची आíथक आणि राजकीय घडी व्यवस्थित बसवणे गरजेचे आहे. इजिप्त हे मुस्लिमबहुल राष्ट्र असले तरी तेथील जनतेवर पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव असून, बरीचशी जनता निधर्मी आहे. मात्र मुस्लिम ब्रदरहुडच्या हातात कारभार गेल्याने त्यांची वाटचाल हळूहळू धार्मिक सत्ताकारणाच्या दिशेने होऊ लागली आहे. याचा तोटा या पिरॅमिडच्या देशालाच होणार आहे.