भारतीय हवाई दलाने मागणी नोंदवलेल्या सर्व नव्या एएच-६४ ई अपाचे आणि सीएच-४७ एफ (आय) चिनूक लष्करी हेलिकॉप्टरचा पुरवठा  बोईंग कंपनीकडून  करण्यात आला आहे.

२२ अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरपैकी अखेरच्या टप्प्यातील पाच हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलाला हिंडान हवाई तळावर सुपूर्द करण्यात आली. याआधी मार्चमध्ये बोईंगने एकूण १५ सीएच-४७ एफ (आय) चिनूक भारीवहन हेलिकॉप्टरपैकी शेवटची पाच भारतीय हवाई दलाच्या ताब्यात दिली होती.

याबाबत बोईंग डिफेन्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सुरेंद्र आहुजा यांनी सांगितले की, भारतासोबतच्या भागीदारीत ग्राहकहित, आधुनिकीकरणाशी कटिबद्धता आणि भारताच्या संरक्षण दलांची सुसज्जता ही आमची प्रमुख मूल्ये आहेत. भारताला लष्करी हेलिकॉप्टरचा पुरवठा करून आम्ही ही भागीदारी आणखी मजबूत केली आहे. भारताच्या संरक्षण दलांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्या क्षमता विकसित करण्याच्या कार्यात समरसतेने सहभागी होण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.

संरक्षण ताफ्यात अत्याधुनिक ‘अपाचे’ समाविष्ट केलेल्या जगातील १७ देशांपैकी भारत एक आहे. ‘अपाचे’चे सर्वात आधुनिक रूप असलेली एएच-६४ ई हेलिकॉप्टर भारताला मिळाली आहेत. अमेरिकेसह अन्य काही देशांच्या ताफ्यात ही हेलिकॉप्टर आहेत. यात अत्याधुनिक संपर्क, वहन, संवेदक आणि शस्त्रास्त्र प्रणाली बसविण्यात आली आहे. यातील सुधारित अत्याधुनिक लक्ष्यनिर्धारण यंत्रणेद्वारे दिवसा आणि रात्री तसेच सर्व प्रकारच्या हवामानात लक्ष्य निश्चित करता येते. यात नाईट व्हिजन नेव्हिगेशनची सुविधाही आहे.

जगातील २० देशांच्या संरक्षण दलांनी आपल्या ताफ्यात चिनूकचा समावेश केला आहे, किंवा त्याच्या खरेदीचे करार केले आहेत. गेल्या ५० वर्षांपासून भारी वहन श्रेणीतील हे एक अत्यंत विश्वसनीय हेलिकॉप्टर मानले जाते.

उष्ण हवामान, अतिउंची आणि प्रतिकूल वारे अशा स्थितीत जेथे अन्य हेलिकॉप्टर उड्डाण करू शकत नाहीत, तेथे चिनूक कामगिरी बजावते. सीएच-४७ एफ (आय) चिनूकमध्ये अत्याधुनिक यंत्रसामुग्री, सीएएएस कॉकपिट आणि डिजिटल अ‍ॅटोमॅटिक फ्लाईट कंट्रोल सिस्टीम या वैशिष्टय़ांचा मेळ साधला गेला आहे.

मेक इन इंडिया, स्किल इंडिया !

हैदराबादमधील टाटा बोईंग एरोस्पेस लिमिटेड (टीबीएएल) हा बोईंगचा भारतातील संयुक्त प्रकल्प आहे. या ठिकाणी एएच-६४ अपाचे हेलिकॉप्टरची रचनात्मक सामुग्री तयार केली जाते. ही सामुग्री अमेरिकेचे लष्कर तसेच अन्य आंतरराष्ट्रीय ग्राहकांसाठी वापरली जाते. भारतातील विमाने आणि संरक्षण दलाच्या वापरासाठीची एकात्मिक यंत्रणा तयार करण्याचा महत्वपूर्ण टप्पा ‘टीबीएएल’ने गाठळा आहे. बोईंगचे भारतातील पुरवठादार चिनूकचे महत्वाचे सुटे भाग तयार करतात. भारतातील अशा २०० हून अधिक भागिदार आणि पुरवठादारांसोबत बोईंग हे मेक इन इंडिया आणि स्किल इंडिया योजनेंर्तगत काम करीत आहे.