पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ भारताकडून मोठया प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरचे काम सुरु आहे. या कामावर चीनचा मुख्य आक्षेप होता. काहीही करुन भारताने हे काम थांबवावे, यासाठी चीनचा आटापिटा सुरु होता. पँगाँग टीएसओ, हॉटस्प्रिंग आणि गलवान खोऱ्यात घुसखोरी करणाऱ्या चीनला हे काम रोखायचे होते. त्यासाठी त्यांनी आक्रमकता दाखवली. पण भारताने त्यांच्या कुठल्याही दादागिरीला न जुमानता काम सुरुच ठेवले.

चीनने ज्या प्रमाणे आपल्या हद्दीत बांधकाम केले आहे, तसेच आम्ही आमच्या हद्दीत रस्ते, पूल उभारणीचे काम करणार अशी भारताची भूमिका होती. पण चीन संपूर्ण गलवान खोऱ्यासह फिंगर फोरपर्यंत दावा सांगून या बांधकामावर आक्षेप घेत होता. पण भारत आपल्या भूमिकेवर ठाम राहिला. उलट गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर तर भारताने चीनच्या सीमेच्या दिशेने जाणाऱ्या पूल, रस्ते उभारणीच्या कामाला अधिक गती दिली.

पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळील रस्ता उभारणीमध्ये बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. लेहजवळ बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने एकूण तीन पूल उभारले. चीन बरोबर तणावाच्या काळात लष्कराचे रणगाडे सुद्धा या पुलावरुन जाऊ शकतात. राष्ट्रीय महामार्ग एकवर KM 397 येथे आम्ही तीन महिन्यांच्या आत पूल उभा केला. ‘कुठलाही भार पेलण्यास हा पूल सक्षम आहे’ असे बीआरओचे अधिकारी बी. किशन यांनी सांगितले. उद्या युद्धाचा प्रसंग उदभवल्यास भारतीय सैन्य लगेच सीमेवर कूच करु शकते तसेच दौलत बेग ओल्डी येथे धावपट्टी सुद्धा बांधण्यात आली आहे. एकूणच भारताच्या सैन्य हालचाली प्रचंड वेगाने होऊ शकतात, याचीच धास्ती चीनला असल्याने ते या भागात रस्ते, पूल उभारणीच्या कामाला विरोध करत होते.