बोस्टन मॅरेथॉनच्या वेळी २०१३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेत झोखर सारनाएव या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांला मॅरेथॉनच्या अंतिम सीमारेषेवर बॉम्ब ठेवल्याबद्दल मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सप्टेंबर २०११ नंतरचा हा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला होता. या वेळी दोन स्फोटांत तीन ठार, तर २६४ जण जखमी झाले होते.
न्यायाधीशांना यायाबत निर्णय घेण्यास चौदा तास लागले. सारनाएव याचा भाऊही बॉम्ब ठेवण्यात त्यांच्याबरोबर सामील होता. सारानाएव याच्यावर सर्व तीस आरोप सिद्ध झाले असून न्यायाधीशांनी मृत्युदंडाच्या बाजूने मत दर्शवले. मृत्युदंडावर मतभेद होते पण या गंभीर गुन्ह्य़ासाठी तशीच शिक्षा होणे अपेक्षित होते असे अ‍ॅटर्नी जनरल लोरेटा इ लिंच यांनी सांगितले. सारानाएव याला पश्चाताप झालेला दिसला नाही. त्याचा मोठा भाऊ तामेरलान याने त्याला बॉम्ब ठेवण्याचे कृत्य करण्यास प्रवृत्त केले हा बचाव पक्षाचा युक्तिवाद फेटाळला गेला. ११ सप्टेंबरनंतर एखाद्या अतिरेक्यास मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्याची ही पहिलीच वेळ आहे असे फेडरल डेथ पेनल्टी रिसोर्स कौन्सेल प्रोजेक्टचे संचालक केव्हिन मॅकनली यांनी सांगितले.