News Flash

बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा गांधींपेक्षा मोठे नेते- ओवेसी

मोदी पाकिस्तानला जशास तसे उत्तर देऊ शकलेले नाहीत

संग्रहित छायाचित्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा गांधींपेक्षा मोठे नेते आहेत, असे वक्तव्य एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. ते रविवारी उत्तर प्रदेशातील संभल येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलत होते. यावेळी ओवेसी यांनी म्हटले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा गांधी यांच्यापेक्षा मोठे नेते होते. त्यांनी देशाला निधर्मी आणि जातीमुक्त संविधान दिले. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचे धर्मनिरपेक्ष संविधान लिहले नसते तर देशात अन्याय , अत्याचार वाढले असते. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी देशातील वातावरण परिस्थिती बिघडवण्याची एकही संधी सोडली नसती, असे असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले. यावेळी ओवेसी यांनी खादी ग्रामोद्योग समितीच्या दिनदर्शिका आणि रोजनिशींवरील महात्मा गांधींजी यांचे छायाचित्र हटवून मोदींचे छायाचित्र लावण्यात आल्याच्या मुद्द्यावरही भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला महात्मा गांधीजींचे अनुयायी म्हणवतात. मात्र, जेव्हा मोदींना गांधींजींच्या जागी स्वत:चे छायाचित्र लावण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी ती साधली. महात्मा गांधी यांच्याजागी  छायाचित्र छापल्याने मोदी आता महात्मा मोदी बनले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटले असेल की, चरखा घेऊन गांधीजींच्या जागी बसण्याची हीच योग्य वेळ आहे, असे ओवेसी यांनी म्हटले.

यावेळी ओवेसींनी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावरही टीका केली. लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी पाकिस्तानला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्याची भाषा करत होते. मात्र, सर्जिकल स्ट्राईकनंतर सीमेवर आपले २८ जवान पाकिस्तानच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडले आहेत. परंतु, मोदी पाकिस्तानला कोणतेही जशास तसे उत्तर देऊ शकलेले नाहीत, अशी टीका ओवेसी यांनी केली.

यापूर्वी ओवेसी यांनी केंद्र सरकार जाणूनबुजून अल्पसंख्यांक समाज असलेल्या भागांमध्ये नोटा पाठवत नसल्याचा आरोप केला होता. नोटाबंदीच्या निर्णयाद्वारे सरकारने मुस्लिम समाजाला त्रास देण्याचा प्रयत्न केला असा दावाही ओवेसींनी केला होता. नरेंद्र मोदी यांना हुकूमशहा ठरवत ओवेसी म्हणाले, मोदींनी स्वतःचा अहंकार जपण्यासाठी संपूर्ण समाजात गोंधळाची स्थिती निर्माण केली. नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबररोजी नोटाबंदीचा निर्णय घेतला. काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा मोदींचा दावा आहे. पण मोदींचे हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, त्यांनी लोकांना निराशेच्या गर्तेत ढकलले असे ओवेसी यांनी सांगितले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 9:32 pm

Web Title: br ambedkar bigger leader than mahatma gandhi asaduddin owaisi
Next Stories
1 आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी केजरीवाल यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस
2 स्पर्धकांना संपवण्यासाठी जिओमध्ये घसघशीत गुंतवणूक
3 लिनोव्हो झेड २ प्लसच्या किमतीमध्ये घसरण, ग्राहकांची इ-कॉमर्स वेबसाइटकडे धाव
Just Now!
X