पाटण्यातील पोलीस ठाण्यातील अजब प्रकार; पोलिसांचीही मद्यचाचणी होणार

दारुबंदीच्या पाश्र्वभूमीवर बिहारमध्ये वेळोवेळी जप्त करण्यात आलेली शेकडो लीटर दारू पोलिस ठाण्यांमधूनच गायब होत असून, मानवी गुन्हेगारांवर वचक ठेवणाऱ्या पोलिसांना या दारूचोरांना आळा घालता येत नाही, कारण पोलिसांच्या मते हे मद्य उंदीर रिचवत आहेत. त्यामुळे पोलिसांची जप्त करण्यात आलेल्या मद्यरक्षणाबाबची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी जप्त केलेल्या दारूचा साठा तर रिता केला नाही ना, हे तपासण्यासाठी  आकस्मिक ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर चाचणी’ होणार आहे, असे पाटण्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मनू महाराज यांनी पीटीआयला सांगितले.

पोलीस ठाण्यांमध्ये जमा असलेल्या दारूच्या बाटल्यांचा ढीग नष्ट करण्यासाठी पोलीसोा न्यायालयाची परवानगी मागणार असल्याचेही पाटण्याच्या पोलीस उपमहानिरीक्षकांची भेट घेतल्यानंतर महाराज यांनी सांगितले. साठवून ठेवलेल्या दारूचा दुरुपयोग रोखण्यासाठी पोलीस ठाण्यातील मालखान्यांची नियमित तपासणी करणे हाही दुसरा उपाय असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, राज्याच्या पोलीस मुख्यालयाने या घटनेच्या तपासाचा आदेश दिला आहे. पाटणा क्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षकांना या प्रकाराची चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्या अहवालाच्या आधारे मुख्यालय पुढील कारवाई करेल, असे अतिरिक्त पोलीस महासंचालक एस.के. सिंघल यांनी सांगितले.

मूषकमौज!

उंदरांनी पोलीस ठाण्यांतील मालखान्यांवर आक्रमण केले असून, पोलिसांनी जप्त केलेली ९ लाख लिटरहून अधिक दारू संपवली आहे, अशा बातम्या प्रसारमाध्यमांनी दिल्यानंतर, कुरतडणारे प्राणी या अंधारकोठडीत चैन करत असल्याची बाब उघडकीला आली.

बिहारमध्ये दारूबंदी करण्यात आल्यानंतर गेल्या १३ महिन्यांमध्ये देशी दारू तसेच देशात निर्मित विदेशी दारू मिळून ९.१५ लाख लिटर दारूचा प्रचंड साठा जप्त करण्यात आल्याचे या बातम्यांमध्ये म्हटले आहे. या दारूचा बराच मोठा भाग पोलीस ठाण्यांमध्ये नेण्यात येत असताना नष्ट झाला, तर जवळजवळ तितकाच मोठा भाग कुरतडणाऱ्या प्राण्यांनी पोलीस ठाण्यांच्या मालखान्यात फस्त केला, असेही उघडकीला आले आहे.