ब्रेग्झिट विधेयकाला संसदेची मंजुरी * ४३ महिने चाललेल्या राजकीय, संवैधानिक घडामोडींचे फलित

लंडन : बऱ्याच चर्चेनंतर ब्रिटनच्या संसदेने ब्रेग्झिट विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर शुक्रवारी रात्री ब्रिटन अधिकृतपणे युरोपीय समुदायातून मुक्त झाला आहे. यावेळी ब्रेग्झिट समर्थकांनी रस्त्यांवर उतरून आनंदाने जल्लोष केला.

ब्रेग्झिट समझोता करारावर गुरुवारी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्वाक्षरी केली व नंतर महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनीही या करारास मंजुरी दिली होती. सार्वत्रिक निवडणुकीतील यशानंतर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कुठल्याही परिस्थितीत ब्रेग्झिट तडीस नेण्याचा निर्धार केला होता. युरोपीय समुदायाच्या वतीनेही करारावर स्वाक्षऱ्यांचे सोपस्कार पार पडले. ब्रिटनची पुढील वाटचाल कशी होते याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

२०१६ मध्ये जनमताच्या माध्यमातून ब्रिटनने युरोपीय समुदायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर ४३ महिन्यांनी हे स्वप्न अखेर पंतप्रधान जॉन्सन यांच्या नेतृत्वाखाली साकार झाले.

माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी या मुद्दय़ावर जनमत घेण्याचे मान्य केले होते. त्यानंतर २०१६ मध्ये हे जनमत झाले. त्यात जास्त लोकांनी (५२ टक्के)  ब्रेग्झिटच्या बाजूने कौल (विरोधात ४८ टक्के) दिल्यानंतरही प्रत्यक्ष बाहेर पडण्याच्या मुद्दय़ावरून वाटाघाटी सतत फिसकटत गेल्या त्यामुळे युरोपीय समुदायातून बाहेर पडण्यासाठी बराच वेळ लागला.

त्यावेळी ब्रिटनच्या मोठय़ा शहरांनी युरोपीय समुदायात राहण्याचा तर लहान शहरांनी बाहेर पडण्याचा कौल दिला होता. इंग्लंड व वेल्स यांनी ब्रेग्झिटच्या बाजूने कौल दिला, तर उत्तर आर्यलड व स्कॉटलंड यांनी युरोपीय समुदायात राहण्याचे ठरवले. एडिंबर्ग येथे युरोपीय समुदायाचा  झेंडा अर्ध्यावर उतरवला जाणार नाही असे स्कॉटिश संसदेने म्हटले आहे.

ब्रिटनच्या प्रमाणवेळेनुसार रात्री ११ वाजता युरोपीय समुदायातून ब्रिटन बाहेर पडला, तर युरोपीय समुदायातील ब्रसेल्सच्या प्रमाणवेळेनुसार सायंकाळी सहा वाजता काडीमोडाची अखेरची घटिका पार पडली.

युरोपीय समुदायाचा फेरआराखडा

ब्रसेल्स येथे युरोपीय समुदायाचे अध्यक्ष चार्लस मिशेल व युरोपीय समुदाय आयोगाच्या नेत्या उर्सुला व्हॉन ड लेयन यांनी आता २७ देश उरलेल्या युरोपीय समुदायाचा फेरआराखडा तयार करण्यासाठी बैठक घेतली.

‘शेवट नाही, तर सुरुवात’

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सकाळीच ईशान्य इंग्लंडमधील ब्रेग्झिट समर्थक संडरलँड येथे मंत्रिमंडळाची बैठक घेतली. नंतर त्यांनी देशाला उद्देशून दूरचित्रवाणीवर भाषण केले. ब्रेग्झिट हा शेवट नसून सुरुवात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशाचे हे खरे पुनर्निर्माण असून बदलाची सुरुवात आहे असे त्यांनी स्पष्ट केले. ब्रेग्झिट समर्थक निगेल फॅरेज व त्यांच्या समर्थकांनी देशभक्तीपर गाणी व भाषणांनी लंडनच्या पार्लमेंट चौकात ब्रेग्झिटचा क्षण साजरा केला.