News Flash

मल्या, ललित मोदी यांना भारतात परत आणा!

मल्ल्या यांनी ९०९१ कोटी रुपयांची कर्जबुडवेगिरी केली व त्याची वसुली करण्यासाठी मल्या यांना भारतात आणणे आवश्यक आहे,

| March 15, 2016 12:55 am

काँग्रेस सदस्यांनी सोमवारी विजय मल्या आणि ललित मोदी यांच्याविरोधात राज्यसभेत जोरदार घोषणाबाजी केली.

काँग्रेसची राज्यसभेत मागणी; खासदारांच्या गदारोळानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब
देशातील बँकांचे ९ हजार कोटींचे कर्ज बुडवणारे उद्योगपती विजय मल्या व आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी यांना भारतात परत आणावे, अशी मागणी काँग्रेसने सोमवारी राज्यसभेत केली.
शून्य प्रहरात काँग्रेसचे सदस्य प्रमोद तिवारी यांनी हा विषय उपस्थित करताच काँग्रेसचे इतर सदस्य हे सभापतींच्या आसनासमोर जमले व त्यांनी घोषणाबाजी केली. पक्षाने गेल्या आठवडय़ातही हा मुद्दा उपस्थित केला होता. तिवारी यांनी मुद्दा उपस्थित करताना सांगितले की, विजय मल्या हे भाजपच्या पाठिंब्याने राज्यसभेत निवडून आले आहेत. राज्यसभेचे उपाध्यक्ष पी.जे.कुरियन यांनी मल्या यांच्या प्रश्नावर तिवारी यांनी दिलेली नोटीस अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी स्वीकारलेली नाही. हे प्रकरण राज्यसभेच्या नैतिकता समितीकडे संदर्भासाठी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, काँग्रेस सदस्यांनी विजय मल्ल्या, मोदी को वापस लाओ, वापस लाओ अशा घोषणा दिल्याने गोंधळ सुरूच राहिला. इतर काही सदस्यांनी गोंधळातच लक्षवेधी सूचना मांडल्या, परंतु काही मिनिटातच राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.
दुहेरी एनआरआय- काँग्रेस
दरम्यान, विजय मल्या यांचे प्रकरण काँग्रेसने सभागृहाबाहेरही लावून धरले आहे. मल्या यांना ब्रिटनमधून भारतात आणण्याची कारवाई सरकार करणार की नाही याचे उत्तर देण्यात यावे, आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी यांनाही परत आणण्याचे आश्वासन सरकारने दिले होते त्यात पुढे काहीच झाले नाही, त्याप्रमाणेच आताही चालढकल केली जाणार का, असा सवाल काँग्रेसने केला. मल्ल्या यांनी ९०९१ कोटी रुपयांची कर्जबुडवेगिरी केली व त्याची वसुली करण्यासाठी मल्या यांना भारतात आणणे आवश्यक आहे, असे सांगून काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला व पी.एल. पुनिया यांनी सांगितले की, सरकार मल्या यांचे प्रकरणही ललित मोदी प्रकरणासारखेच हाताळणार असा आम्हाला संशय आहे. मल्या हे सरकारच्या कथित काळा पैसा बाहेर काढण्याच्या योजनेनुसार दुहेरी ‘एनआरआय’ आहेत, त्यात ते ‘नॉन रिपेयिंग इंडियन’ व ‘नॉन रिटर्निग इंडियन’ आहेत. भाजपने जाहीर केलेली काळा पैसा बाहेर काढण्याची योजना सदोष असून त्यात दंडाची रक्कम भरून मोकळे होता येणार आहे. त्यामुळे ती फेअर अँड लव्हली स्कीम आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. त्या योजनेनुसार मल्या हे दुहेरी एनआरआय (अनिवासी भारतीय ) आहेत असे म्हणायला हरकत नाही. पंतप्रधान मोदी यांनी १०० दिवसात काळा पैसा भारतात आणण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता तर केलेली नाहीच, पण ललित मोदी यांना भारतातून जाऊन २२ महिने लोटले आहेत व आता मल्या यांनीही पलायन केले आहे. २ मार्चला मल्या देशाबाहेर गेले त्याआधी ते अर्थमंत्री अरूण जेटली यांना भेटले किंवा त्यांच्याशी बोलले की नाही यावर सरकारने माहिती जाहीर करावी.
जेटली यांनी त्यांचे काय बोलणे झाले याची माहिती पंतप्रधानांना दिली का, ती माहिती संसदेतही मांडली जाणार का? असा सवालही काँग्रेसने केला आहे. सरकारने फेअर अँड लव्हली योजना थांबवून ललित मोदी व विजय मल्या यांना परत आणण्यासाठी निर्णायक कृती करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा काँग्रेसने व्यक्त केली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2016 12:55 am

Web Title: bring back vijay mallya lalit modi demands congress in rajya sabha
टॅग : Lalit Modi,Vijay Mallya
Next Stories
1 संघाची आयसिसशी तुलना केल्याप्रकरणी राज्यसभेत तीव्र पडसाद
2 इशरतसंबंधीच्या गहाळ फाइल्सबाबत तपास करण्यासाठी समिती स्थापन
3 शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राहुल आक्रमक
Just Now!
X