हवाई हल्ले करणार
सीरियातील आयसिसचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी तेथे हवाई हल्ले करण्याबाबत ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी गुरुवारी आपली योजना जाहीर केली. सीरियात कारवाई करणे देशहिताच्या दृष्टीने आवश्यक असून, यास पाठिंबा द्यावा, असे आवाहन कॅमेरून यांनी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात केले.सीरियामध्ये आयसिसला आणखी हातपाय पसरू देणे हे ब्रिटनच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. ब्रिटनच्या सुरक्षेसाठी परदेशांवर विसंबून राहणे योग्य नाही. इतर देश आयसिसविरोधात कारवाई करीत असताना ब्रिटननेही आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे कॅमेरून म्हणाले.सीरियात आयसिसविरोधात लढण्यासाठी ब्रिटनचे जवान तैनात करण्यात येणार नसल्याचे कॅमेरून यांनी स्पष्ट केले. ब्रिटन सरकारने इराक युद्धातून धडा घेतल्याचे त्यांनी सांगितले, मात्र हवाई हल्ले करण्याच्या बाजूने बहुमत आहे असे वाटत नाही तोपर्यंत कनिष्ठ सभागृहात या प्रस्तावावर मतदान घेणार नसल्याचे कॅमेरून यांनी स्पष्ट केले.