पूंछमधील हल्ला ताजा असतानाच गुरुवारी पुन्हा एकदा याच विभागातील मेंधार भागामध्ये नियंत्रण रेषेपलीकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. नियंत्रणरेषेवरील भारतीय जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिल्यामुळे घुसखोर माघारी फिरले. याच स्वरुपाची आणखी एक घटना सांबा भागातही घडली. तिथेही सीमेपलीकडून घुसखोरी करण्याचा काही दहशतवाद्यांचा प्रयत्न सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी उधळून लावला. दोन्ही ठिकाणी घुसखोरी करण्यासाठी आलेले घुसखोर सैन्याच्या प्रतिकारानंतर माघारी फिरले.
पूंछमधील सरला छावणीवर सोमवारी रात्री पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात भारतीय लष्करातील पाच जवान शहीद झाले होते. या घटनेमुळे दोन्ही देशातील तणाव वाढला असतानाही सीमेपलीकडून घुसखोरी करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न अद्याप सुरू आहेत.