नोटाबंदीवरून विरोधकांच्या निशाण्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. पंतप्रधान मोदींनी ‘यम’ बनून लोकांच्या मागे लागू नये, असे त्या म्हणाल्या. लखनऊमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

नोटाबंदी हा काळा अध्याय आहे. पंतप्रधान मोदी यांच्या बोलण्यावरून ते लोकांच्या अपेक्षा पूर्ण करतील, असे वाटत नाही. अच्छे दिन येतील असे वाटत नाही. पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर जनता नाराज झाली आहे, अशा शब्दांत मायावती यांनी मोदी यांच्यावर टीका केली. लोकांना आपला पैसा खर्च करण्याचे स्वातंत्र्य असायला हवे. लघु उद्योजकांनाही त्यांच्याकडून दिलासा मिळेल, अशी आशा आहे. आपल्या बँक खात्यात १५ लाख रुपये कधी येतील, याची लोक वाट पाहत आहेत. लखनऊमधील रॅलीत भाड्याने लोक आणले होते, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

नोटाबंदीनंतर किती काळा पैसा बाहेर आला आणि त्याचा किती लोकांना फायदा झाला, याची माहिती पंतप्रधान मोदींनी द्यावी, अशी मागणीही मायावती यांनी केली. कोणतीही पूर्वतयारी न करता हा नोटाबंदीचा निर्णय घेतला आहे. त्याचा काहीही फायदा झालेला नाही. सरकार आता या मुद्द्यापासून पळ काढत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. नोटाबंदीच्या निर्णयामुळे लघु उद्योजकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. पंतप्रधान मोदी यांनी या निर्णयानंतर लोकांना खोटी आश्वासने दिली. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी अशाच प्रकारची खोटी आश्वासने दिली होती, असा आरोप मायावती यांनी केला. आम्ही काळा पैसा आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आहोत, पण नोटाबंदीच्या निर्णयाला आमचा पाठिंबा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर विरोधकांकडून टीका होत आहे. नोटाबंदीमुळे देशभरात चलनसमस्या निर्माण झाली. बँकांसमोरील रांगांमध्ये अनेकांनी जीव गमावला, असे सांगून काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी मोदींवर निशाणा साधला. नोटाबंदीचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी निदर्शने केली. नोटाबंदीच्या मुद्द्यावरून संसदेच्या अधिवेशनाचे कामकाजही होऊ शकले नाही. आता या निर्णयाविरोधात काँग्रेसतर्फे देशभरात मोहीम हाती घेतली जाणार आहे.