राजस्थानमध्ये बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय समन्वयक रामजी गौतम आणि माजी प्रदेश प्रभारी सीताराम मेघवाल यांची बसपाच्याच नाराज कार्यकर्त्यांनी, चक्क त्यांच्या तोंडाला काळे फासून, गळ्यात चप्पल,बुटाचा हार घालून गाढावरवरून धिंड काढल्याचा प्रकार घडला आहे. हा सर्व प्रकार मंगळवारी सकाळी जयपुर येथील बसपाच्या मुख्यालयाच्या आवारात घडला.

यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, उत्तर प्रदेशमधुन जयपुरला पोहचलेल्या बसपाच्या राष्ट्रीय समन्वयकासह अन्य दोघांना येथील काही नाराज बसपा कार्यकर्त्यांनी घेरले होते. एवढेच नाहीतर या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय समन्वयक रामजी गौतम व माजी प्रदेश प्रभारी सीताराम यांच्या तोंडाला काढे फासले, त्यांच्या गळ्यात चप्पला, बुटांचा हार घातला व यानंतर त्यांना गाढवावर बसवून त्यांची धिंड देखील काढली. माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर तिकीटांची विक्री केल्याचा व धोकेबाजीचा आरोप केला आहे.

या घटेनवरून संतप्त झालेल्या बसपा प्रमुख मायावती यांनी यामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, राजस्थानमध्ये अगोदर काँग्रेसने बसपाचे आमदार फोडले व आता चळवळीचे काम बिघडवण्यासाठी त्यांच्याकडून वरिष्ठ नेत्यांवर हल्ले घडवले जात आहेत. हा प्रकार अतिशय निंदनीय व लाजीरवाणा आहे. काँग्रेस आंबेडकरी चळवळीविरोधात अत्यंत चुकीचे वागत आहे. जशास तसे उत्तर कार्यकर्ते देऊ शकतात, असेही त्या म्हणाले आहेत.