बुलंदशहराजवळील चिंगरावठा येथे तथाकथित गोरक्षकांच्या झुंडीने पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या केली होती. याप्रकरणात अटकेत असलेल्या सात आरोपींना उच्च न्यायालयात जामीन मिळाला आहे. धक्कादायक म्हणजे जामीन मिळाल्यानंतर आरोपींच्या समर्थकांनी तुरूंगाबाहेर त्यांचे स्वागत करत घोषणाबाजी केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशातील बुलंदशहराजवळ असलेल्या महावमध्ये गोमांस सापडले होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, याचे पडसाद चिंगरावठी येथेही उमटले होते. जमावाने रास्ता रोको केला. यावेळी पोलिसांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला होता. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल झालेला असून, एआयआरची प्रत देण्यासही पोलीस तयार झाले होते. मात्र, काही जणांनी चिथावणी दिल्यानंतर हिंसक झालेल्या जमावाने वाहनांची तोडफोड करीत जाळपोळ केली. यावेळी पोलीस निरीक्षक सुबोध कुमार यांच्यासह दोघांची गोळ्या घालून हत्या केली होती. तसेच सुबोध कुमार यांच्यावर कुऱ्हाडीनेही वार करण्यात आले होते. या घटनेप्रकरणी पोलिसांनी 22 आरोपींसह 50 ते 60 अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता.

याप्रकरणातील सात आरोपींनी जामीनासाठी अर्ज केला होता. त्यांना प्रयागराज उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. देशद्रोहाच्या 24 ए कलमामुळे त्यांचा जामीन स्थगित करण्यात आला होता. या कलमाचा अभ्यास केल्यानंतर न्यायालयाने सात आरोपींना जामीन दिला. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींच्या स्वागतासाठी तुरूंगाबाहेर त्यांच्या समर्थक जमा झाले होते. या घटनेतील मुख्य सूत्रधार शिखर अग्रवालचे एखाद्या नेत्यासारखे हार घालून स्वागत करण्यात आले.