बुरहान दहा वर्षांचा असताना त्याला भारतीय लष्करात जाण्याची इच्छा होती, असा खुलासा त्याचे वडील मुझफ्फर वानी यांनी केला आहे. बुरहान वानी हा हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा कमांडर होता. काही महिन्यांपूर्वी भारतीय लष्कराबरोबर झालेल्या चकमकीत त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर काश्मीर खोऱ्यात उसळलेला हिंसाचार अद्याप शमलेला नाही. या हिंसाचारात आतापर्यंत अनेकांना प्राण गमवावे लागले असून गंभीर दुखापती झालेल्या तरूणांची संख्या लक्षणीय आहे. बुरहानच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांनी कट्टरपंथीयांना पाठिंबा देत कडवट प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मात्र, आता त्यांचा विरोधी सूर मवाळ झाल्याचे दिसत आहे. बुरहान वानी यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, बुरहान १० वर्षांचा असताना त्याला भारतीय लष्करात जाण्याची इच्छा होती. तसेच तो चांगला क्रिकेटही खेळायचा आणि एकदिवस तो नक्कीच परवेझ रसुलप्रमाणे भारतीय संघासाठी क्रिकेट खेळला असता, असे मुझफ्फर वानी यांनी मुलाखतीदरम्यान म्हटले. मात्र, उरीसह पठाणकोट, पम्पोर येथील दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा हात असल्याची शक्यता मुझफ्फर यांनी फेटाळून लावली आहे. काश्मीरचा मुद्दा निकाली निघेपर्यंत दहशतवादी हल्ले थांबणे अशक्य आहे. काश्मीरमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रत्येक दहशतवादी काश्मिरी होतो. दहशतवादी हल्ल्यामध्ये भारतीय मुस्लिमांचाही सहभाग असू शकतो किंवा हा हल्ला काश्मिरी दहशतवाद्यांनीही केलेला असू शकतो, असे मुझफ्फर वानी यांनी म्हटले आहे.     दरम्यान, माझा तिसरा मुलगा बंदूक उचलणार नाही, माझ्या मुलीने शिक्षक व्हावे, अशी माझी इच्छा आहे आणि मी कुठल्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नसल्याचेही मुझफ्फर वानी यांनी सांगितले.