केंद्रीय मंत्रिमंडळातील बहुचर्चित फेरबदल रविवारी (दि.३) सकाळी १० वाजता होणार असल्याचे सांगण्यात येते. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या मंत्र्यांचा शपथविधी समारोह राष्ट्रपती भवनात सकाळी १० वाजता होणार आहे. नूतन राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे पहिल्यांदाच मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील. सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शपथग्रहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवनात तयारी सुरू करण्यात आली आहे.

मे २०१४ मध्ये केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारचा हा मंत्रिमंडळातील तिसरा फेरबदल असेल. एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी सकाळी दहाच्या सुमारास राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळ्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. गुरूवारी रात्री राजीवप्रताप रूडी, संजीवकुमार बालियान, फग्गनसिंह कुलस्ते आणि महेंद्रनाथ पांडे यांनी राजीनामा दिला आहे. भाजपमधील सूत्रांनुसार, याशिवाय आणखी दोन कॅबिनेट मंत्र्यांनीही राजीनामा सादर केला आहे. त्याचबरोबर इतर काही मंत्र्यांनीही राजीनामा देण्याची तयारी दर्शवली असेल्याचे बोलले जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री उमा भारती, राधामोहन सिंह, गिरिराज सिंह, कलराज मिश्रा, निर्मला सीतारमण यांनीही मंत्रिमंडळ फेरबदलासाठी आपला राजीनामा सादर केला आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंतप्रधान मोदी हे ब्रिक्स संमेलनात सहभागी होण्यासाठी चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. गुजरात, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीला अमित शहा लागले असून त्या दृष्टीने पक्षात उत्साह आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत. या तिन्ही राज्यात केंद्रीय मंत्री राहिलेल्या भाजप नेत्यांना शहा हे महत्वाची भूमिका देऊ शकतात. यासंबंधी गुरूवारी शहा यांनी मोदींची भेट घेतली होती, असेही सांगण्यात येते. परंतु, या वृत्ताला अजून पुष्टी मिळू शकलेली नाही.