आंध्र प्रदेशमधून वेगळ्या तेलंगणा राज्यनिर्मितीसाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून, येत्या २० दिवसांमध्ये तो मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारी दिली.
वेगळ्या तेलंगणा राज्याची निर्मिती करण्याचा निर्णय कॉंग्रेसच्या कार्यकारी समितीने काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्यानंतर या विषयीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले. प्रस्ताव तयार झाल्यानंतर तो सुरुवातीला कायदा मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल. त्यांच्याकडून होकार मिळाल्यानंतर तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले.
मंत्रिमंडळाने वेगळ्या तेलंगणाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव मंजूर केल्यावर मंत्रिगटाची निर्मिती केली जाईल. हा मंत्रिगट आंध्र प्रदेशमधून तेलंगणा वेगळा केल्यावर उदभवणाऱया विविध प्रश्नांचा सखोल अभ्यास करेल. त्यानंतरच हा प्रस्ताव मंजुरीसाठी आंध्र प्रदेशच्या विधीमंडळाकडे पाठविण्यात येईल.