पंतप्रधान कार्यालयाची सारवासारव

जाहिरातींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राचा वापर करण्यासाठी एखाद्याने मंजुरी घेतली अथवा नाही याची माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही. ही माहिती देण्यासाठी यामध्ये अधिक अभ्यास होणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) म्हटले आहे.

पीटीआयच्या प्रतिनिधीने माहिती अधिकाराअंतर्गत पीएमओकडे याबाबत माहिती मागितली होती. मात्र यासाठी अधिक अभ्यासाची आवश्यकता असून, ठोस स्वरूपात याबाबत माहिती उपलब्ध नसल्याचे पीएमओने म्हटले आहे.

कोणत्याही प्रकारची माहिती गोळा करण्यासाठी प्रत्येक पावती किंवा संवादाच्या फाइल्स जमा करण्यासाठी सखोल अभ्यास करावा लागेल. या प्रकारचे व्यापक काम करण्यासाठी कार्यालयाच्या सामान्य कामकाजासाठी लागणाऱ्या साहित्याचा दुसऱ्या ठिकाणी वापर होईल आणि माहिती अधिकार अधिनियम २००५ चे कलम सात (९) तरतूद लागू होतील, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.

पंतप्रधानांच्या छायाचित्रांचा वापर करणाऱ्या कंपनी, संस्था आणि व्यक्ती यांनी त्याबाबत मागितलेल्या मंजुरीबाबत पीएमओ कार्यालयाला विचारण्यात आले होते.  जाहिरातीमध्ये मोदी यांचा वापर करणाऱ्या रिलायन्स जिओ आणि पेटीएमद्वारा मागितलेल्या मंजुरीबाबत आमच्याकडे कोणताही दस्तावेज उपलब्ध नसल्याचे पीएमओने म्हटले आहे.