कॅनडाने भारताला या वर्षांपासून पुढील पाच वर्षे युरेनियम पुरवण्याचे मान्य केले असून त्यामुळे भारताला अणुऊर्जा निर्माण करणे सोपे जाणार आहे. आज याबाबतच्या करारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर  यांनी स्वाक्षऱ्या केल्या. कॅनडाला गेल्या ४२ वर्षांत भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.
 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कॅनडात आले असून त्यांचे येथे भव्य स्वागत करण्यात आले.  कॅनडाचा युरेनियम पुरवण्याचा निर्णय द्विपक्षीय सहकार्यासाठी पडलेले मोठे पाऊल आहे. आज याबाबतच्या करारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर  यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
 कॅनडाची कॅमेको कॉर्पोरेशन ही कंपनी ३ हजार मेट्रिक टन युरेनियन पुरवणार आहे. पाच वर्षांत हा पुरवठा केला जाणार असून युरेनियमची किंमत २५४ दशलक्ष डॉलर आहे. युरेनियमचा पुरवठा याच वर्षी सुरू होणार आहे. रशिया व कझाकस्ताननंतर भारताला युरेनियम पुरवठा करणारा कॅनडा हा तिसरा देश ठरला आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या देखरेखीखाली भारताला युरेनियम पुरवठा केला जाणार आहे. युरेनियममुळे भारताची वीजनिर्मिती क्षमता वाढणार आहे.
कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर यांनी मोदी यांच्याशी चर्चेनंतर युरेनियमबाबत कराराची घोषणा केली. भारत व कॅनडा हे दोन्ही देश अनेक दशकांनंतर नागरी अणुकार्यक्रमात सहकार्य करणार आहेत. मोदी यांनी सांगितले की, भारताबाबत निराशावादाची भूमिका बदलली असून त्याचा फायदा आता होणार आहे. द्विपक्षीय संबंध सुधारण्यात पंतप्रधान हार्पर यांनी जे सहकार्य केले त्यासाठी आपण आभारी आहोत असे मोदी यांनी स्पष्ट केले.