करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या जगभरामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीकडे आपण एक संधी म्हणून पाहिले पाहिजे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील जनतेशी संवाद साधताना व्यक्त केलं. यावेळी बोलताना मोदींनी स्थानिक पातळीवरील वस्तुंच्या खरेदी विक्रीला चालना देण्याचे आवाहन देशातील नागरिकांना केलं. लोकलसाठी वोकल व्हा आणि त्याचा प्रसार करा असं मोदी म्हणाले. याच आवहानाला सकारात्मक प्रसिसाद देत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज एक महत्वाची घोषणा केली आहे. देशातील सर्व केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) कॅनटीनमध्ये केवळ स्वदेशी खाद्य पदार्थांची विक्री केली जाणार असल्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला आहे. यासंदर्भात शाह यांनी ट्विटवरुन माहिती दिली आहे. शाह यांनी केलेल्या ट्विटमध्ये भारतीयांनी एक निश्चय केला तर भारत पाच वर्षांमध्ये आत्मनिर्भर होईल असंही म्हटलं आहे.

एक जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून त्यामुळे केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), केंद्रीय सुरक्षा दलासाठी (बीएसएफ) केवळ भारतात निर्मिती झालेले प्रोडक्ट उपलब्ध असणार आहेत. “काल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि स्थानिक उत्पादनांचा उपयोग करण्यासंदर्भात एक आवाहन केलं. नक्कीच यामुळे भविष्यात जगाचे नेतृत्व करण्याचा भारताचा मार्ग सुखकर होईल. याच पार्श्वभूमीवर आज गृह मंत्रालयाने एक निर्णय घेतला आहे. सर्व केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएएफपी) कॅन्टीमध्ये यापुढे केवळ स्वदेशी उत्पादनांची विक्री होईल. एक जून २०२० पासून देशभरातील सर्वा सीएपीएफ कॅन्टीनमध्ये हा नियम लागू होईल. यामुळे १० लाख सीआरपीएफ कर्मचाऱ्यांचे ५० लाख नातेवाईक स्वदेशी उत्पादनांचा वापर करतील,” असं शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

जनतेलाही केलं आवाहन

भारतीयांनी जास्तीत जास्त प्रमाणात स्वदेशी गोष्टींचा वापर करावा असं सांगत शाह यांनी जनतेलाही स्वदेशी उत्पादने वापरण्याचे आवाहन केलं आहे. “आपल्या देशात निर्माण झालेल्या उत्पादांनांचा अधिक अधिक वापर करावा असं मी देशातील जनतेला आवाहन करतो. तसेच यासाठी त्यांनी इतरांनाही प्रोत्साहन द्यावे. हा मागे राहण्याचा काळ नसून संकटालाच संधी बनवण्याची वेळ आहे. प्रत्येक भारतीयाने भारतामध्ये तयार होणारी उत्पादने वापरण्याचा निश्चय केला तर पुढील पाच वर्षांमध्ये भारत आत्मनिर्भर बनू शकतो,” असं शाह यांनी म्हटलं आहे.