हैदराबादमधील गाचीबोवली परिसरामध्ये शनिवारी एक भीषण अपघात झाला. नव्यानेच सुरु झालेल्या बायोडायव्हर्सीटी उड्डाणपुलावरुन जाणाऱ्या एका गाडीवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ती थेट उड्डाणपुलावरून खाली कोसळली. या अपघाताचा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या अपघातामध्ये यात एका महिलेचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.

बायोडायव्हर्सीटी उड्डाणपुलावर शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास लाल रंगाच्या वोल्सवॅगन जीटीआय गाडीला हा अपघात झाला. हा अपघात झाला तेव्हा मीलन नावाची व्यक्ती गाडी चालवत होती. वेळीच गाडीमधील एअर बॅग उघडल्याने मीलन बचावली असली तरी उड्डाणपुलाखाली उभ्या असणाऱ्या सत्यवेणी नावाच्या महिलेचा या अपघातामध्ये दूर्देवी मुत्यू झाला.

या उड्डाण पुलाचे ४ नोव्हेंबर रोजी उद्धाटन झाले असून तेव्हापासून घडलेला हा दुसरा मोठा अपघात आहे. १० नोव्हेंबर रोजी एका आयटी इंजिनियरने या उड्डाणपुलावर तीन गाड्यांना धडक दिली होती. या अपघातामध्ये दोन बाईकस्वार ठार झाले होते. शनिवारच्या या अपघानंतर या उड्डाणपुलाच्या रचनेवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे.