लंडन : ब्रिटनच्या पार्लमेंटबाहेर एक वेगात आलेली मोटार सुरक्षा अडथळ्यांवर आदळली. त्यात काही पादचारी जखमी झाले असून स्कॉटलंड यार्डच्या सशस्त्र पोलिसांनी मोटारचालकाला अटक केली आहे. ही घटना दहशतवादाशी संबंधित आहे की नाही हे समजू शकले नाही. असे असले तरी या ठिकाणी दहशतवाद विरोधी कायद्यानुसार अपेक्षित असलेले सुरक्षा कडे करण्यात आले आहे.

काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले, की ही मोटार मुद्दाम लोकांवर आदळवण्यात आली. सकाळी ७.३७ वाजता हा प्रकार झाला असून पोलिसांनी तातडीने त्यावर प्रतिसाद दिला आहे. पार्लमेंट इमारतीबाहेर लावलेल्या सुरक्षा अडथळ्यांवर आदळण्यापूर्वी या गाडीने अनेक लोकांना ठोकरले. त्यात अनेक पादचारी जखमी झाले. वेस्टमिन्स्टर येथे पार्लमेंट संकुलात लोखंडी अडथळे लावलेले आहेत, त्यावर ही मोटार आदळली. स्कॉटलंड यार्डच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की एका व्यक्तीला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी चालकाला हातकडय़ा घालून नेल्याचे दृश्य लोकांनी पाहिले. लंडनच्या रूग्णवाहिका सेवेने दोन व्यक्तींवर उपचार केले व नंतर रूग्णालयात नेले.  पार्लमेंट स्क्वेअर भोवतीच्या भागाला सुरक्षा कडे करण्यात आले असून चौकशी सुरू आहे.

वेस्टमिन्स्टर टय़ूब स्टेशन बंद करण्यात आले असून मिलबँक, पार्लमेंट स्क्वेअर, व्हिक्टोरिया टॉवर गार्डन्सच्या आजूबाजूचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. या भागात कडक  बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या पार्लमेंटचे अधिवेशन सुरू नाही. मोटार रस्त्याच्या चुकीच्या बाजूने चालली होती, तेथे काही सायकलस्वार होते त्यांना मोटारने ठोकरले. चंदेरी रंगाची ही छोटी मोटार होती व ती वेगाने धडकल्यानंतर थोडी उंच उडाली. मार्च २०१७ मध्ये वेस्टमिनस्टर ब्रीज येथे हल्ल्यात चार जण ठार झाले होते.