उत्तर प्रदेश पोलीस खात्यातील आठ पोलिसांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला कुख्यात गुंड विकास दुबेला १० जुलै रोजी एन्काउंटरमध्ये ठार करण्यात आलं. विकास दुबेला अटक केल्यानंतर विशेष पथक त्याला घेऊन कानपूरला चाललं होतं. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनचा अपघात झाला. यानंतर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. विकास दुबे याने पोलिसांचं शस्त्र घेऊन गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी विकास दुबेला आत्मसमर्पण करण्यास सांगितलं. यादरम्यान झालेल्या चकमकीत पोलिसांनी विकास दुबेला ठार केलं. मात्र आता या गाडीचा अपघात कसा झाला यासंदर्भात दुबेला कानपूरला आणणाऱ्या स्पेशल टास्क फोर्सने माहिती दिली आहे.

९ जुलै रोजी दुबेला उज्जैनमध्ये अटक करण्यात आली. अटक करण्यात आल्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस आणि स्पेशल टास्क फोर्सने रस्ते मार्गाने विकास दुबेला उज्जैनवरुन कानपूरला नेण्याचा निर्णय घेतला. मात्र कानपूरजवळ आल्यावर हायवेवर दुबेला घेऊन जाणाऱ्या गाडीचा अपघात झाला. हा अपघात कसा झाला यासंदर्भात स्पेशल टास्क फोर्सने, “लांबचा प्रवास करुन गाडीचा चालक थकला होता. त्यातच गुरांचा एक कळप अचानक रस्त्यावर गाडीसमोर आला. त्यामुळे त्यांना वाचवण्याच्या नादात गाडीचा अपघात झाला,” असं म्हटलं आहे.

दुबेला घेऊन जाणाऱ्या गाडीचा अपघात झाला त्यामध्ये पाच पोलीस जखमी झाले. “या अपघाताचा फायदा घेऊन दुबेने रमांत पचुरी या पोलीस अधिक्षकाकडून बंदूक हिसकावून घेतली आणि तो हायवेच्या बाजूला असणाऱ्या कच्च्या रस्त्याकडे पळू लागला,” असंही स्पेशल टास्क फोर्सने म्हटलं आहे. दुबेकडे ९ एमएमची बंदूक होती असा दावा केला जात आहे. या गाडीच्या मागून येणाऱ्या गाडीमधील पोलिसांनी दुबेला घेऊन जाणारी गाडी पलटल्यानंतर तातडीने गाडीतील पोलीस कर्मचाऱ्यांची मदत करण्यासाठी पलटलेल्या गाडीकडे धाव घेतली तर काही पोलीस कर्मचारी दुबेच्या मागावर गेले. पोलिस कर्मचाऱ्यांना ठार करण्याच्या उद्देशाने दुबेने गोळीबार सुरु केला. दुबेला जिवंत पकडण्यासाठी पोलीस त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तो गोळीबार करत असल्याने पोलिसांना त्याच्या अधिक जवळ जाता येत नव्हते, असंही स्पेशल टास्क फोर्सने प्रसिद्ध केलेल्या माहितीमध्ये म्हटलं आङे.

“या सर्व गोंधळामध्ये स्वत:च्या संरक्षणासाठी दुबेवर गोळी चालवण्याशिवाय इतर पर्याय पोलिसांकडे नव्हता. पोलिसांनीही दुबेला थांबवण्यासाठी त्याच्या दिशेने गोळीबार केला. दुबे यामध्ये जखमी झाला आणि खाली कोसळला. प्राथमोपचासाठी त्याला जवळच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं,” असंही स्पेशल टास्क फोर्सने म्हटलं आहे. शिवेंद्र सिंग सेंगर आणि यमाल यादव हे दोन्ही पोलीस कर्मचारी या चकमकीमध्ये जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार दुबेच्या छातीत दोन तर हातावर एक गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

मात्र स्पेशल टास्क फोर्सच्या या स्पष्टीकरणामध्ये अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत. अपघाताच्या अडीच तास आधी म्हणजेच पहाटे चार वाजता दुबेला घेऊन येणारा ताफा टोल नाक्यावरुन जाताना दुबे हा वेगळ्या गाडीत असल्याचे दिसत होते. अपघात झाला तेव्हा दुबे त्याच गाडीत कसा होता. अपघात झाला त्या जागेपासून दोन किमी अंतरावरच प्रसारमाध्यमांना का थांबवण्यात आलं?, ६० प्रकरणांमध्ये दोषी असणाऱ्या दुबेला बेड्या का घालण्यात आल्या नव्हता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गाडी पलटल्यावर दुबेने बंदूक हिसकावून घेत गाडीतून बाहेर येत पळ काढला. या अनेक प्रश्नांची उत्तरे स्पेशल टास्क फोर्सच्या निवेदनामध्ये नाहीत.