लेफ्टनंट कर्नलसह दोघांना अटक; तीन दिवसांची सीबीआय कोठडी

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) लष्कराच्या मुख्यालयातील बदल्यांमधील घोटाळा उघडकीस आणला आहे. इच्छित ठिकाणी बदली करून घेण्यासाठी लाखो रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी लेफ्टनंट कर्नलसह एका मध्यस्थाला अटक करण्यात आली  आहे. या दोघांना विशेष न्यायालयाने तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली.

लेफ्टनंट कर्नल रंगनाथन सुवरामणी मोनी (लष्कराचा कार्मिक विभाग)आणि गौरव कोहली (मध्यस्थ) अशी या दोघांची नावे आहेत. बंगळुरू येथील अधिकाऱ्याकडून लाखोंची लाच घेतल्याप्रकरणी या दोघांना अटक करण्यात आहे. ”नवी दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू आणि थिरूवनंतपुरम येथे छापे घालून १० लाखांची रोकड आणि काही कागदपत्रे हस्तगत करण्यात आली” असे सीबीआयचे प्रवक्ते आर. के. गौर यांनी शनिवारी सांगितले. या दोन्ही आरोपींसह लष्कराच्या मुख्यालयातील एका ब्रिगेडीयरच्या निवासस्थानीही छापे घालण्यात आल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.

सीबीआयने दोन्ही आरोपींना अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर केले. ”हा मोठा घोटाळा असून, याबाबत सखोल तपास करण्याची गरज आहे. त्यात काही वरिष्ठही सामील असण्याची शक्यता आहे” असे स्पष्ट करत सरकारी वकील अमित कुमार यांनी या दोघांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. आरोपींनी याआधीही असा गुन्हा केला आहे का आणि असेल तर त्याचे लाभार्थी कोण होते, याबाबतही सीबीआय चौकशी करत असल्याचे न्यायालयात स्पष्ट करण्यात आले. आरोपींचे आवाजाचे नमुनेही घेण्यात येणार असून, त्यांना एकमेकांसमोर हजर करण्यात येणार असल्याने त्यांची कोठडीतील चौकशी गरजेची आहे, याकडे सीबीआयने न्यायालयाचे लक्ष वेधले. विशेष सीबीआय न्यायाधीश नरेशकुमार मल्होत्रा यांनी या दोघांना तीन दिवसांची कोठडी सुनावली.

मोनी यांच्यासह हैदराबादस्थित लष्करी अधिकारी पुरूषोत्तम, बंगळुरू येथील अधिकारी एस. सुभाष आणि मध्यस्थ गौरव कोहली यांच्याविरोधात गुन्हेगारी कट आणि भ्रष्टाचारप्रकरणी १ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. एफआयआरमध्ये ब्रिगेडीयर एस. के. ग्रोव्हर यांचे नाव असले तरी आरोपींच्या यादीत त्यांच्या नावाचा उल्लेख नाही. सीबीआयने छाप्यादरम्यान ग्रोव्हर यांचे फोन आणि लॅपटॉप जप्त केले आहेत.

नेमका गैरप्रकार काय?

लेफ्टनंट कर्नल रंगनाथन सुवरामणी मोनी यांनी कोहली व पुरुषोत्तम यांना हाताशी धरून बदल्यांमध्ये गैरप्रकार केला. पुरुषोत्तम हा लष्करी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून इच्छित ठिकाणी बदली करून देण्याचा प्रस्ताव देत असे. लष्करी मुख्यालयातील कार्मिक विभागातील अधिकाऱ्यांशी लागेबांधे असलेल्या कोहली याच्याशी पुरूषोत्तम हे संपर्क करायचे. आपल्या चांगल्या संपर्काच्या बळावर कोहली हा लष्करी अधिकाऱ्याकडून पैसे घेऊन त्यांची इच्छित ठिकाणी बदली घडवून आणायचा. पुरुषोत्तम याने डी. एस. आर. के. रेड्डी व सुभाष यांच्या बदल्या करून देण्यासाठी कोहली याला सांगितले होते. रेड्डी आणि सुभाष यांना बंगळुरू येथून सिकंदराबाद किंवा विशाखापट्टणमला बदली हवी होती. सुभाष यांच्या बदलीसाठी मोनी यांनी ब्रिगेडीयर ग्रोव्हर यांच्याशीही संपर्क साधल्याचे समोर आले आहे. बदलीसाठी सुभाष यांनी कोहली याला हवाला माध्यमातून पाच लाखाची लाच दिल्याचे ‘एफआयआर’मध्ये म्हटले आहे.