मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुरुवारी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये मिळून ४० ठिकाणी छापे टाकले. सीबीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भोपाळ, इंदोर, उज्जैन, रेवा, जबलपूर, लखनौ, अलाहाबाद या शहरांमध्ये विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले.
व्यापम घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने १०५ गुन्हे दाखल केले आहेत. या पैकी कोणत्याही एका गुन्ह्याशी संबंधित हे छापे नसून, एकूणच या घोटाळ्यामागील कट उघड करण्यासाठी छापे टाकण्यात आले आहेत. छापे टाकण्यात आलेल्या ठिकाणी सीबीआयचे अधिकारी विविध कागदपत्रांची पाहणी करीत आहेत. या घोटाळ्याशी संबंधित सर्व गुन्हे सीबीआयने तपासासाठी स्वतःकडे घ्यावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने याआधीच दिले आहेत. त्या गुन्ह्यांचा तपास कुठेपर्यंत झाला आहे, याचा कोणताही विचार न करता, सर्व गुन्हे तुमच्याकडे घ्या आणि त्याचा तपास करा, असे सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाने म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर हे छापे टाकण्यात आले.