चारा घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या शिक्षेचा फैसला विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पुढे ढकलला. त्यामुळे शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष न्यायालयात लालूप्रसाद यांच्या शिक्षेची घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान कालच्या सुनावणीत न्यायालयात एक मजेशीर प्रकार घडला. ‘मी निर्दोष आहे, मी काहीही केलं नाही. मला तुरुंगात खूप थंडी वाजते’ असं लालू प्रसाद यादव यांनी न्यायालयात सांगितलं. तेव्हा, थंडी वाजत असेल तर तुम्ही तबला वाजवा असं मजेशीर उत्तर न्यायाधीशांनी दिलं. या उत्तरानं उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

या सुनावणीदरम्यात कोर्टातलं गंभीर वातावरण थोडं हलकं झालं.  ‘तुरुंगात तुम्हाला काही त्रास तर झाला नाही ना ?’ असा प्रश्न सीबीआय न्यायाधीश शिव पाल सिंह यांनी लालू प्रसाद यादव यांना विचारला, त्यावर मला माझ्या नातेवाईकांना भेटू देत नसल्याची तक्रार लालूंनी केली. पण, त्यांच्या तक्रारीवर स्मितहास्य करत तुम्हाला यासाठीच तर कोर्टात आणलं आहे अशी टिप्पणी न्यायाधीशांनी केली आणि पुन्हा एकदा कोर्टातील उपस्थितांमध्ये हशा पिकला.

चारा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांच्यासह १६ जणांना याप्रकरणी दोषी ठरवले आहे. दि. २३ डिसेंबरला देवघर कोषागारमधून ८९ लाख २७ हजार रूपये अवैधरित्या काढल्याप्रकरणी लालू यांना दोषी ठरवण्यात आले आहे. याप्रकरणी एकूण ३८ जणांना आरोपी ठरवण्यात आले होते. यातील ११ जणांचा मृत्यू झाला. तिघे सीबीआयचे साक्षीदार झाले. तर दोघांनी आपला गुन्हा कबूल केला होता.