खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून आदर्श सहकारी संस्थेत सदनिका मिळविणाऱ्या उत्तम खोब्रागडे आणि देवयानी खोब्रागडे यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्याचा केंद्रीय अन्वेषण विभाग विचार करीत आहे आणि त्या दृष्टीने पुरेशी कागदपत्रेही विभागास मिळाली आहेत.
देवयानी यांना राज्य सरकारतर्फे असलेल्या राखीव कोटय़ात एक जागा मिळालेली असतानाही खोटी कागदपत्रे आणि प्रतिज्ञापत्रे सादर करून आदर्श गृहनिर्माण संस्थेत सदनिका लाटली. याच दरम्यान खोब्रागडे कुटुंबीयांकडे असलेल्या जमिनीचा तपशीलही दडवून ठेवण्यात आला होता, असे पुरावे सीबीआयला मिळाले आहेत.
सीबीआयतर्फे ‘आदर्श’तील लाभार्थी आणि सत्य मालमत्तेचा तपशील दडवून ठेवणारे यांचा कसून तपास केला जात आहे.  याअंतर्गत तपास अधिकाऱ्यांना देवयानी यांना २००५ मध्ये ओशिवरा येथे सरकारी गृहनिर्माण संस्थेत सदनिका मिळाल्याची कागदपत्रे मिळाली. सरकारी नियमांनुसार, ज्या जमिनीचे भाव सवलतीच्या दरात आहेत, अशा जमिनीवर बांधल्या गेलेल्या एकापेक्षा अधिक सदनिका एकाच व्यक्तीस मिळू शकत नाहीत. म्हणूनच खोब्रागडे यांच्या नावाचा आरोपपत्रात समावेश करण्याचा विचार केला जात आहे.