केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातील (सीबीआय) संघर्षात आता भर पडली आहे. ‘सीबीआय’चे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरोधातील लाचखोरी प्रकरणाचा तपास करणाऱ्या ए के बस्सी यांनी अंदमान- निकोबार येथील बदलीला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. माझ्याकडे राकेश अस्थानांविरोधात सबळ पुरावे होते आणि या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे.
सीबीआयमधील वादावर हस्तक्षेप करीत आणि या यंत्रणेवर नियंत्रण पुनस्र्थापित करण्यासाठी केंद्र सरकारने ‘सीबीआय’चे संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना या दोघांचे अधिकार काढून घेत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. वर्मा यांच्या जागी सरकारने संयुक्त संचालक एम. नागेश्वर राव यांची हंगामी नियुक्ती केली. पदभार स्वीकारताच राव यांनी अस्थाना यांची चौकशी करणाऱ्या वर्मा यांच्या पथकातील १३ अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या केल्या होत्या.यात बस्सी यांचा देखील सहभाग होता. त्यांची अंदमान- निकोबारला बदली करण्यात आली होती.
बस्सी यांच्या वतीने मंगळवारी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेत त्यांनी अस्थानांविरोधात सबळ पुरावे असल्याचा दावा केला. तसेच या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणीही त्यांच्या वतीने करण्यात आली. या प्रकरणातील तक्रारदार सतीशबाबू साना यांनी देखील सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने हैदराबाद पोलिसांना साना यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 30, 2018 12:20 pm