नवी दिल्ली : फरारी हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणाच्या प्रकरणात स्थानिक अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) व सक्तवसुली संचालनालय (ईडी) यांचे एक संयुक्त पथक लवकरच लंडनला रवाना होणार आहे. नीरव मोदीने जामिनासाठी केलेल्या अर्जावर तेथील न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

सीबीआय व ईडी यांतील संयुक्त संचालक स्तराचा प्रत्येकी एक अधिकारी आवश्यक त्या कागदपत्रांसह लंडनसाठी बुधवारी रवाना होण्याकरता नियुक्त करण्यात आला आहे. ईडीने नीरव मोदीची पत्नी अमि हिच्याविरुद्ध दाखल केलेले आरोपपत्र या यंत्रणेचा अधिकारी घेऊन जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारतीय अधिकारी ब्रिटनमधील क्राऊन प्रॉसिक्युशन सव्‍‌र्हिससह त्या देशातील विविध अधिकाऱ्यांची भेट घेतील आणि त्यांना मोदी, त्याचे कुटुंबीय आणि इतर यांच्याविरुद्धचे या प्रकरणाशी संबंधित आरोप व ताजा पुरावा याबाबत माहिती देतील.

आपले मामा मेहुल चोक्सी यांच्याशी संगनमत करून ४८ वर्षांचा नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेची २ अब्ज अमेरिकी डॉलरहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तो लंडनमध्ये एका आलिशान वस्तीत राहात असल्याचे वृत्त ब्रिटनच्या ‘दि टेलिग्राफ’ या वृत्तपत्राने दिले होते.

भारताने प्रत्यार्पणासाठी केलेल्या विनंतीच्या आधारे नीरव मोदी याला नंतर अटक करण्यात येऊन, गेल्या वर्षी सीबीआयच्या विनंतीवरून त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. गेल्या आठवडय़ात त्याला वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेटच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. जिल्हा मॅजिस्ट्रेट मारी मॅलन यांनी नीरवला जामीन नाकारताना त्याची २९ मार्चपर्यंत कोठडीत रवानगी केली होती. जामीन मंजूर केल्यास नीरव शरण येणार नाही असे मानण्यास पुरेसा आधार असल्याचे त्यांनी म्हटले होते.