जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेलगत पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरु आहे. या गोळीबारात एका १० वर्षीय मुलाचा आणि एका मुलीचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, पाच नागरिक जखमी झाले आहेत. मृत मुलाचे नाव असरार अहमद असल्याची माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानी सैन्याने सकाळी ६.३० वाजता केरन क्षेत्रात जोरदार गोळीबार सुरु केला. पाकिस्तानी सैन्याच्या गोळाबारात जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. ‘सकाळी पाकिस्तानी सैन्याने भारतीय चौक्यांवर कोणत्याही कारणाशिवाय गोळीबार सुरु केला. पाकिस्तानी सैन्याच्या या गोळीबाराला भारतीय जवान चोख प्रत्युत्तर देत आहेत,’ अशी माहिती संरक्षण दलातील सूत्रांनी दिली.

पाकिस्तानी सैन्याने सीमावर्ती भागातील १० ते १२ गावांना लक्ष्य केले आहे. याशिवाय, भारतीय सैन्याच्या शाहपूर, केरन सेक्टरमधील चौक्यांवरही पाकिस्तानकडून गोळीबार सुरु आहे. याबरोबरच उखळी तोफांचाही मारा केला जात आहे. यामुळे सीमेजवळील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबद्दल जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘पाकिस्तान भित्र्या लोकांचा देश आहे. ते एका बाजूला पांढरे निशाण फडकवतात आणि दुसऱ्या बाजूला नागरिकांना लक्ष्य करतात,’ अशा शब्दांमध्ये त्यांनी संताप व्यक्त केला.