चीनच्या राजदूतांची भेट घेतल्याने वाद निर्माण झाला असतानाच अखेर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी या वादावर मौन सोडले आहे. मी चीनच्या राजदूतांची भेट घेतल्याने केंद्र सरकारला चिंता वाटत असेल तर सीमेवर तणाव असताना त्यांचे तीन मंत्री चीनमध्ये पाहुणचार का झोडत होते?, यावर सरकारने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची चीनचे राजदूत ल्यूओ झाओहुई यांनी भेट घेतली. यावरुन वाद सुरु झाला असून भाजपनेही राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. राहुल गांधींनी जनतेमधील गैरसमज दूर करण्यासाठी स्वत: या भेटीवर स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी भाजपने केली होती. या वादावर राहुल गांधी यांनी सोमवारी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी म्हणाले, मी चीन आणि भूतानचे राजदूत, पूर्वोत्तर राज्यांमधील काँग्रेस नेते आणि माजी सुरक्षा सल्लागार यांची भेट घेतली. महत्त्वाच्या विषयांवर सर्वांची भेट घेणे हे माझे काम आहे. राजदूतांची भेट घेतल्याने सरकारला चिंता वाटत असेल तर त्यांचे तीन मंत्री सीमेवर तणाव असताना चीनमध्ये पाहुणचार का झोडत होते? असा सवाल विचारत सरकारने यावरुनही स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी गांधी यांनी केली.

राहुल गांधी यांनी ट्विटरवर मोदी आणि शी जिनपिंग यांचे झोपाळ्यावर एकत्र बसलेले छायाचित्र शेअर केले. ‘सीमा रेषेवर एक हजार चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली असताना मी आरामात झोपाळ्यावर बसून राहणारा माणूस नाही’ असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, राहुल गांधी आणि चीनच्या राजदुतांच्या भेटीवरुन काँग्रेसची चांगलीच तारांबळ उडाली होती. सुरुवातीला काँग्रेसने भेटीचे वृत्तच फेटाळून लावले होते. काँग्रेसने प्रसारमाध्यमांवरच आगपाखड केली होती. मात्र दुपारी काँग्रेसने यू-टर्न घेत भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला.