सणासुदीनंतर काही राज्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने केंद्र सरकारने गुजरात, हरियाणा, राजस्थान आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये पथके रवाना केली आहेत. अन्य राज्यांतही केंद्रीय पथके पाठवली जाणार आहेत. तसे संकेत यापूर्वीच केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिले होते.

गेल्या चोवीस तासांमध्ये दिल्ली (७५४६), केरळ (५७२२), महाराष्ट्र (५५३५), पश्चिम बंगाल (३६२०), राजस्थान (२५४९) या पाच राज्यांमध्ये सर्वाधिक करोना रुग्ण आढळले आहेत. दहा राज्यांमध्ये ७७.२० टक्के रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीमध्ये करोना आटोक्यात आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने एकत्रितपणे युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. अन्य राज्यांमध्ये केंद्रीय पथके पाठवली जाणार असल्याची माहिती शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

दिल्लीमध्ये प्रतिदिन सात हजार रुग्णांची नोंद होऊ  लागल्याने शेजारील राजस्थान व हरियाणा या राज्यांमध्ये तातडीने केंद्रीय पथके पाठवली गेली आहेत. केंद्राने सर्व राज्यांनी नमुना चाचण्यांची संख्या वाढवण्याचे आदेश दिले असून एकही संभाव्य करोनाबाधित चाचणीतून निसटू नये याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांचे उच्चस्तरीय पथक हरियाणाला तर, निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल याचे पथक राजस्थानला रवाना झाले आहे.

दिल्लीत घरोघरी तपासणी

करोनाच्या संशयित रुग्णांची शोधमोहीम शुक्रवारपासून सुरू झाली असून घरोघरी तपासणी केली जात आहे. करोनाची लक्षणे दिसत असतील तर तातडीने नमुना चाचणी केली जात आहे. त्यासाठी एकूण ९,५०० हजार चमू नेमले असून त्यापैकी ३ हजार चमूंनी काम सुरू केले आहे. दिल्लीतील सुमारे साडेचार हजार प्रतिबंधित विभागांमध्ये प्रामुख्याने लक्ष केंद्रीत केले गेले आहे.