‘चांद्रयान-२’ मोहिमेअंतर्गत चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरवण्यात आलेल्या विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित करण्याच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात आल्या आहेत. कारण, विक्रम लँडर ज्या भागांत उतरले तिथे रात्र होण्यास सुरूवात झाली आहे. पुन्हा दिवस होईपर्यंत विक्रम लँडर निष्क्रीय होऊ शकते.
आगामी काही तासांतच चंद्रावर लुनर डे संपणार आहे. त्यामुळे तेथील वातावरण पूर्णपणे बदलणार आहे. त्यामुळे विक्रमशी संपर्क करणे किंवा फोटो काढणेही शक्य नाही. इस्रोच्या नियोजित वेळापत्रकानुसार विक्रम लँडर केवळ १४ दिवस काम करणार होते. म्हणजे २१ सप्टेंबरनंतर विक्रम लँडरचा संशोधनासाठी काहीच उपयोग होणार नाही. विक्रम लँडर उतरलेल्या भागामध्ये लवकरच रात्र सुरु होणार आहे. त्यावेळी येथील तापमान उणे १८० डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली जाते. विक्रम लँडरने चंद्रावर दिवस असताना सर्व संसोधन करणे अपेक्षित होते. मात्र संपर्क तुटल्याने विक्रम लँडरच्या माध्यमातून कोणतेच संशोधन करण्यात इस्रोला अद्याप यश आले नाही. त्यामुळेच चंद्रावरील या भागात रात्र झाल्यानंतर पुन्हा दिवस होईपर्यंत विक्रम लँडर निषक्रिय होण्याची शक्यता जास्त असून त्यानंतर पुन्हा त्याच्याशी कधीच संपर्क होऊ शकणार नाही.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) महत्वकांशी चांद्रयान-२ मोहिमेअंतर्गत विक्रम लँडर सात सप्टेंबर रोजी चंद्राच्या पृ्ष्ठभागावर उतरणे अपेक्षित होते. मात्र चंद्रावर हे लँडर उतरण्याच्या काही मिनिट आधी त्याचा इस्रोशी संपर्क तुटला. एक हजार ४७१ किलोग्रॅम वजनाचा विक्रम आणि त्याच्या सोबत २७ किलोग्रॅमचा रोव्हर प्रज्ञान चंद्राच्या भूमीवर कोसळला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 21, 2019 10:47 am