चांद्रयान-२ मोहिमेत अखेरच्या टप्प्यात विक्रम लँडरचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला होता. त्यामुळे लँडरचे नेमके काय झाले? हा प्रश्न अनेकांना पडला होता. पण आता इस्रोकडून लँडरबद्दल एक चांगली बातमी समोर आली आहे. विक्रमने चंद्रावर हार्ड लँडिंग केले असले तरी विक्रम लँडरचे काहीही नुकसान झालले नाही.

हा संपूर्ण लँडर एकसंध असून त्याचे तुकडे झालेले नाहीत असे इस्रोच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने इंडिया टुडेने वृत्त दिले आहे. फक्त हा लँडर एकाबाजूला झुकलेला आहे. चंद्राच्या कक्षेत फिरत असलेल्या ऑर्बिटरने पाठवलेला फोटो आणि अन्य डेटाच्या विश्लेषणावरुन ही माहिती समोर आली आहे. चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या २.१ किलोमीटर अंतरावर असताना लँडरचा इस्रोच्या जमिनीवर नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. लँडर सापडला असला तरी त्याच्याशी अजून संपर्क होऊ शकलेला नाही. पुढचे १४ दिवस संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल असे इस्रोकडून सांगण्यात आले आहे.

ऑर्बिटरने जे फोटो पाठवले आहेत त्यानुसार ठरलेल्या जागेपासून खूप जवळच हे हार्ड लँडिंग झाले आहे. लँडरचे तुकडे झालेले नसून तो एकसंध आहे. फक्त तो एकाबाजूला कललेला आहे असे चांद्रयान-२ मोहिमेशी संबंधित असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

लँडरशी पुन्हा संपर्क करण्यासाठी आम्ही आमच्यापरीने सर्व प्रयत्न करत आहोत असे या अधिकाऱ्याने सांगितले. इस्रोच्या आयएसटीआरएसी सेंटरमध्ये एक टीम यासाठी सतत काम करत आहे. चांद्रयान-२ मध्ये ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर असे तीन भाग आहेत. २ जुलैला श्रीहरीकोट्टा येथून अवकाशात झेपावल्यानंतर २ सप्टेंबरपर्यंत ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर एकत्र होते. २ सप्टेंबरला चंद्राच्या अपेक्षित कक्षेत पोहोचल्यानंचतर लँडर आणि रोव्हर ऑर्बिटरपासून वेगळे झाले.