28 February 2021

News Flash

चौथ्या दिवशीही ‘विक्रम’कडून प्रतिसाद नाही, इस्रोकडून प्रयत्नांची पराकाष्ठा

विक्रम लँडरबरोबर संपर्क साधण्याचे आमचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. पण अजूनही हा संपर्क होऊ शकलेला नाही .

संग्रहित छायाचित्र

विक्रम लँडरबरोबर संपर्क साधण्याचे आमचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. पण अजूनही हा संपर्क होऊ शकलेला नाही असे इस्रोकडून मंगळवारी सांगण्यात आले. चांद्रयान-२ मधील ऑर्बिटरने लँडर शोधून काढला पण अजून संपर्क होऊ शकलेला नाही असे इस्रोने टि्वटमध्ये म्हटले आहे. इस्रोच्या प्रयत्नांना विक्रमने प्रतिसाद द्यावा अशी समस्त देशवासियांची इच्छा आहे. चांद्रयान-२ मोहिमेच्या अखेरच्या टप्प्यात विक्रम लँडरचा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला होता.

ऑर्बिटरने जो फोटो काढला त्या आधारावर विक्रम लँडरचे तुकडे झालेले नसून तो एकसंध आहे. एका बाजूला कललेला आहे असे वृत्त इस्रोच्या अधिकाऱ्याने हवाल्याने माध्यमांनी दिले होते. पण इस्रोने अजून या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. चंद्रावरचा एक अख्खा दिवस पृथ्वीवरच्या चौदा दिवसांबरोबर आहे. त्यामुळे लँडर आणि रोव्हरची डिझाईन १४ दिवस काम करण्याच्या दृष्टीनेच करण्यात आली होती.

चौदा दिवसांनंतर चंद्रावर रात्र होईल. रात्रीच्यावेळी कडाक्याचा थंडावा असतो त्यावेळी लँडरमधील उपकरण काम करण्याची शक्यता कमी आहे. ऑर्बिटरच्या माध्यमातून ही चांद्रयान-२ मोहिम चालू राहणार आहे. ऑर्बिटरचे आयुष्य साडेसात वर्षांचे असेल असे इस्रोकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यातूनही नवीन माहिती मिळू शकते. चंद्रावर पाणी आणि बर्फाचा शोध लागू शकते. मोहिमेची ९५ टक्के उद्दिष्टे पूर्ण झाल्याचे इस्रोने जाहीर केले आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग सर्वात कठीण – युरोपियन स्पेस एजन्सी
भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेप्रमाणे युरोपियन अवकाश संशोधन संस्थेने सुद्धा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मानवरहित मोहिमेची आखणी केली होती. २०१८ मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवण्याची त्यांची योजना होती. पण पुरेशा निधी अभावी त्यांना आपली नियोजित मोहिम रद्द करावी लागली. या मोहिमेची आखणी करताना चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यामध्ये काय धोके आहेत त्यासंबंधी अहवाल तयार करण्यात आला होता.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर खूप कठीण वातावरण आहे. इथे निकाल खूप अनपेक्षित, धोकादायक आणि आश्चर्यकारक असू शकतो असे युरोपियन अवकाश संशोधन संस्थेच्या अहवालात म्हटले होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील धूळ उपकरणांना चिकटू शकते. त्यामुळे यांत्रिक बिघाड उदभवू शकतो. सोलार पॅनलवर सुद्धा त्याचा परिणाम होईल. त्यामुळे त्या उपकरणांची क्षमता कमी होईल असे या अहवालात म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2019 2:43 pm

Web Title: chandrayaan 2 lander vikram isro orbiter dmp 82
Next Stories
1 चांद्रयान २ : अमूल म्हणतं “चांद तारोको छुने की आशा!”
2 “मोठा नेता व्हायचं असेल तर कलेक्टर, एसपीची कॉलर पकडा”; छत्तीसगडमधील नेत्याचा विद्यार्थ्यांना सल्ला
3 चेन्नई : जमात-उल-मुजाहिद्दीन बांग्लादेशचा दहशतवादी अटक
Just Now!
X