भारताच्या ‘चांद्रयान-२’ मोहिमेच्या अखेरच्या टप्प्यात अचानक ‘विक्रम लँडर’चा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. त्यानंतर ८ सप्टेंबर रोजी विक्रम लँडरचे ठिकाण सापडल्याची माहिती इस्रोने दिली होती. तसेच “ऑर्बिटरने विक्रम लँडरचे थर्मल इमेज काढल्या आहेत”, असे इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवान म्हणाले होते. या घटनेनंतर ऑर्बिटरने टिपलेला चंद्रावरील विक्रम लँडरचा फोटो व्हायरल होत आहे. मात्र, हे फोटो फेक असल्याचे समोर आले आहेत.

७ सप्टेंबर रोजी एक वाजून ५५ मिनिटांनी या चांद्रमोहिमेतील शेवटच्या १५ मिनिटांचा थरार सुरू असतानाच ‘विक्रम लँडर’शी संपर्क तुटला होता. त्यानंतर ८ सप्टेंबर रोजी “चंद्राच्या पृष्ठभागावरील विक्रम लँडरचे ठिकाण आम्हाला सापडले आहे. ऑर्बिटरने विक्रम लँडरचे थर्मल इमेज काढल्या आहेत. मात्र, लँडरशी संपर्क झालेला नाही. आम्ही विक्रम लँडरशी संपर्क करण्याचे प्रयत्न करत आहोत. लवकरच संपर्क होईल”, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवान यांनी दिली. सिवान यांच्या माहितीनंतर चंद्राचा पृष्ठभाग दाखवणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा फोटो विक्रम लँडरचा असून, ऑर्बिटरने काढल्याचा दावाही केला जात आहे.

इस्रोने ऑर्बिटरने फोटो घेतला असल्याची फक्त माहिती दिली होती. ऑर्बिटरने घेतलेला कोणताही फोटो सार्वजनिक केलेला नाही. सध्या चंद्राच्या पृष्ठभागावरील विक्रम लँडरचा ठिकाण दर्शवणारा फोटो व्हायरल होतोय त्याचा चांद्रयान-२ मोहिमेशी कोणताही संबंध नाही. मुळात हा फोटो अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’च्या अपोलो-१६ मोहिमेतील आहे. हा फोटो अपोलो-१६च्या लँडिंगचा असून, नासाने १८ जून २०१९ रोजी एका लेखात वापरलेला आहे.

विक्रम लँडरची थर्मल इमेज म्हणून आणखी एक फोटो व्हायरल होत आहे. तोही नासाच्या Curiosity rover चा आहे. अमेरिकेतील मुक्त पत्रकार जोनाथन ओ’क्लाघन यांनी ही माहिती दिली आहे. ओ’क्लाघन हे अंतराळ आणि पर्यावरण बदलांविषयी लिहितात. “चंद्रावरील विक्रम लँडर असल्याचा दावा करणारा एक फोटो खुप व्हायरल होत आहे. पण हा फोटो नासाच्या Curiosity rover चा आहे. Curiosity rover चंद्रावर असताना हा घेतला आहे”, ओ’क्लाघन यांनी ट्विट करून सांगितले आहे.