नासाच्या शास्त्रज्ञांनी चंद्रावर गोठलेलं पाणी आढळल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे नासाने भारताकडून १० वर्षांपुर्वी प्रक्षेपित करण्यात आलेल्या अंतराळ यान चांद्रयान-१ कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा निष्कर्ष काढला आहे. नासाने चंद्राच्या सर्वात थंड आणि अंधाऱ्या ध्रुवीय क्षेत्रात गोठलेल्या अवस्थेत पाणी आढळल्याची माहिती दिली आहे.

‘पीएनएएस’ जर्नलमध्ये प्रकाशित लेखात बर्फ इकडे तिकडे विखुरलेल्या अवस्थेत असल्याचं सांगण्यात आलं आहे. दक्षिण ध्रुवावर सर्वाधिक बर्फ ल्यूनर क्रेटर्सजवळ जमा झालेला आहे. उत्तर ध्रुवावर बर्फाचं प्रमाण जास्त असून तो विखुरलेल्या अवस्थेत आहे. शास्त्रज्ञांनी मून मिनरेलॉजी मॅपरकडून (एम३) प्राप्त झालेल्या आकड्यांचा वापर करत चंद्रावर गोठलेलं पाणी उपलब्ध असल्याचं सांगितलं आहे.

नव्या माहितीनुसार, बर्फ चंद्रावरील ध्रुवीय क्षेत्राजवळ असणाऱ्या खड्ड्यांमध्ये जमा झाला आहे, जेथील किमान तापमान -१५६ डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असत नाही. तिथे सुर्यप्रकाशही पोहोचत नाही. चंद्राच्या पृष्ठभागावर योग्य प्रमाणात बर्फ आढळल्यानं आता आगामी मोहिमांसाठी, तसेच चंद्रावर राहण्याच्या दृष्टीनंही पाणी उपलब्ध होण्याच्या शक्यतेचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

अपोलो ११ वर जेव्हा मानव प्रथम चंद्रावर पोहोचला तेव्हा येथील ओसाड व खडकाळ प्रदेश पाहून कुणालाच तिथे पाणी असेल असे वाटले नव्हते आणि तिथे मानवाला राहता येईल, अशीही शक्यता मावळली होती. नासाच्या ओर्बिटर अवकाश यानाला मात्र तेथील ध्रुवावर बर्फ आणि पाणी असल्याचे आढळले, पण भारताच्या चांद्रयानाने चंद्रावरील पृष्ठाभागाखाली मोठय़ा प्रमाणात पाणी असल्याचे पुरावे नासाला दिले होते. त्या आधारावर ब्राउन विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी चंद्राच्या भूपृष्ठाभागाखाली मोठय़ा प्रमाणावर जलसाठे असल्याचे संशोधन २५ जुलै २०१७ मध्ये प्रकाशित केले होते.

ब्राउन विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि पृथ्वी आणि पर्यावरण विभागाचे प्रमुख राल्फ मिलिकेन आणि शुई ली यांनी भारताच्या चांद्रयानची रासायनिक स्पेक्ट्रोमिटरची आकडेवारी, छायाचित्र आणि नासाच्या ‘लुनार रिकानायसन्स ओर्बिटर’ची मिनरल मॅपिंगची माहिती आणि तेथील तापमान याद्वारे संशोधन करून चंद्राच्या लावा भूपृष्ठाखाली मोठय़ा प्रमाणावर जलसाठे असल्याची माहिती मिळाली. यापूर्वी नासाच्या ओर्बिटरने चंद्राच्या थंड ध्रुवावर पाण्याचे बर्फ असल्याचे पुरावे मिळाले होते. अपोलो १५ व १७ अवकाश यानाने मिळवलेल्या खडकांच्या नमुन्यात पाण्याचे अंश मिळाले होते. काही खनिजेसुद्धा मिळाली होती, जी केवळ पाण्याच्या संपर्कात आल्यानेच तयार होतात. मात्र, चंद्राच्या भूपृष्ठावर पाणी कसे असेल अशी शंका व्यक्त केली गेली. चांद्रयान अवकाश यानामुळे आता ध्रुवाव्यतिरिक्त लावा खडकाखालीसुद्धा पाण्याचे साठे असल्याचे सिद्ध झाले आहे. चंद्रयानच्या स्पेक्ट्रोमिटरने घेतलेले छायाचित्र हे दिवसा घेतल्याने तापमानामुळे पाण्याचा तपास लागत नव्हता, पण शास्त्रज्ञांनी थर्मल इमेजला वेगळे करून पाहिल्याबरोबर स्पेक्ट्रोमिटरच्या सहाय्याने पाण्याचे अवशेष आढळले. हे संशोधन ‘रिमोट डिटेक्शन ऑफ वाईडस्पेस इंडिजिनस वॉटर इन लुनार पायरोक्लास्टिक डिपोझिट’ या शीर्षकाखाली विज्ञान मासिकात प्रकाशित करण्यात आले आहे.

हे पाणी कुठून आले असावे यावर मात्र दुमत आहे, पण चंद्र हा पृथ्वीचा एक तुकडा आहे. या सिद्धांतानुसार चंद्राच्या उत्पत्तीच्या वेळी पृथ्वीवरील हायड्रोजन आणि ऑक्सिजन तिथे पोहोचला असावा आणि पाणी तयार झाले असावे असे एक मत आहे. दुसऱ्या मतानुसार चंद्रावर उल्का किंवा धुमकेतूमधून तिथे पाणी आले असावे असा अंदाज शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत.