अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाला भारतीय विक्रम लँडर अखेर सापडलं आहे. मात्र महत्त्वाचं म्हणजे यामध्ये भारतीय तरुणाने मुख्य भूमिका बजावली आहे. नासाच्या ऑर्बिटरला चंद्राच्या भूपृष्ठावर विक्रमचे अवशेष सापडले असल्याची माहिती ट्विटरवरुन देण्यात आली आहे. नासाने चंद्रावरील साऊथ पोलवरील फोटो जारी केले होते. चेन्नईमधील इंजिनिअर शानमुगा सुब्रहमण्यम याने या फोटोंचं व्यवस्थित निरीक्षण करत दुर्घटनाग्रस्त झालेल्या चांद्रयान-२ च्या विक्रम लँण्डरचा ठावठिकाणा मिळवला आहे. यानंतर त्याने नासाला यासंबंधी माहिती दिली. काही वेळाने नासाने अधिकृतपणे याला दुजोरा दिला. नासाने याबद्दल शानमुगा सुब्रहमण्यम याचे आभार मानले असून कौतुकही केलं आहे.

शानमुगा सुब्रहमण्यम उर्फ शान मॅकेनिकल इंजिनिअर आणि कॉम्प्युटर प्रोगामर आहे. सध्या तो चेन्नईमधील लेनॉक्स इंडिया टेक्नॉलॉजी सेंटरमध्ये टेक्निकल आर्किटेक्ट म्हणून काम करत आहे. भारतासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली चांद्रयान-२ मोहीम अखेरच्या टप्प्यात अपयशी ठरली. चंद्रापासून २.१ कि.मी. उंचीवर असतानाच अखेरच्या टप्प्यात अचानक ‘विक्रम लँडर’चा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. तेव्हापासून विक्रम लँडरचे ठिकाण शोधण्याचे प्रयत्न सुरू होते.

शानमुगा सुब्रहमण्यम याने सांगितल्यानुसार, ‘विक्रम लँडर दुर्घटनाग्रस्त झाल्याने लोकांना त्याची माहिती घेण्याची उत्सुकता होती. जर विक्रम लँण्डर यशस्वीपणे लँड झालं असतं तर लोकांमध्ये इतकी उत्सुकता निर्माण झाली असती असं वाटत नाही”.

विक्रम लँण्डर दुर्घटनाग्रस्त झाल्याने आपल्यालाही त्याबद्दल माहिती मिळवावी असं वाटत होतं. यानंतर आपण नासाचे फोटो जुन्या फोटोंना सोबत घेऊन निरीक्षण करण्यास सुरुवात केली असं शानमुगा सुब्रहमण्यमने सांगितलं आहे. “मी शोध घेत असताना लँडिंग स्पॉटच्या उत्तरेच्या बाजूला पाहिलं असता काही छोटे ठिपके दिसले. मी नऊ वर्षातल्या एलआरओ इमेजसोबत तुलना केली असता हाच विक्रम लँण्डरचा मलबा असल्याचं लक्षात आलं. यानंतर मी नासाला कळवलं,” अशी माहिती शानमुगा सुब्रहमण्यमने दिली आहे.

आणखी वाचा- चांद्रयान-२ : विक्रम लँडरचा ठावठिकाणा नासानं शोधला

चांद्रयान २ जीएसएलव्ही मार्क ३ एम १ या प्रक्षेपकाच्या मदतीने २२ जुलै रोजी अवकाशात झेपावले होते. त्यानंतर कक्षाबदलाचे प्रयोग करीत ते १४ ऑगस्टला चंद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले. २० ऑगस्टला यान चंद्राच्या कक्षेत गेले. त्यानंतर २ सप्टेंबरला लँडर विक्रम मूळ चांद्रयानापासून वेगळे झाले होते, नंतर त्याची कक्षा कमी करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले होते. ७ सप्टेंबरला चांद्रभूमीवर उतरणे अपेक्षित होते. मात्र, १५ मिनिटांच्या शेवटच्या थरारक टप्प्यावर अचानक लँडरचा संपर्क तुटल्याने ही मोहीम अपयशी ठरली.

त्यानंतर विक्रम लँडरशी संपर्क करण्याचे प्रयत्न इस्रोकडून करण्यात आले. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर दोन महिन्यानंतर चांद्रयानासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शानमुगा सुब्रहमण्यम याने पाठवलेल्या माहितीवर दोन महिन्यांनी नासाने उत्तर देत यामध्ये तथ्य असल्याचं सांगितलं आहे.