व्हॉट्सअ‍ॅप नव्याने आणू पाहत असलेले गोपनीयता धोरण या कंपनीने मागे घ्यावे, त्यात कुठलेही एकतर्फी बदल हे योग्य नसून ते मान्य केले जाणार नाहीत, असा इशारा भारत सरकारने दिला आहे.

व्हॉट्सअ‍ॅपचे मुख्य कार्यकारी अधिकारी विल कॅथकार्ट यांना पाठवलेल्या पत्रात इलेक्ट्र्ॉनिक व माहिती तंत्रज्ञान खात्याने म्हटले आहे की, भारतात व्हॉट्सअ‍ॅपचे वापरकर्ते जगात सर्वाधिक असून त्यांच्या सेवेसाठी ही मोठी बाजारपेठ आहे.

प्रस्तावित बदलात काही अटी व  सेवा शर्ती यांचा समावेश असून गोपनीयता धोरणात ग्राहकांची माहिती उघड होणार असल्याने त्याबाबत चिंता व्यक्त केली होती, पण हा नियम व्यक्तिगत ग्राहकांसाठी नसून जे लोक व्यापार-व्यवसायासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात त्यांच्यासाठी आहे, असा खुलासा करण्यात आला होता.

व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या धोरणामुळे भारतीय नागरिकांना असलेले पर्याय व स्वायत्तता यावर गदा येईल, असे मंत्रालयाने कंपनीला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने प्रस्तावित बदल मागे घेऊन माहिती गोपनीयता, पर्याय स्वातंत्र्य व माहिती सुरक्षेचा अंगीकार करावा असे केंद्र सरकारने बजावले आहे.

भारतीय लोकांचा कंपनीने सन्मान राखून कुठलेही एकतर्फी बदल करू नयेत. तो अन्यायाचा भाग होईल व त्याला आम्ही मान्यता देणार नाही. व्हॉट्सअ‍ॅपने ज्या प्रस्तावित सेवाशर्ती जारी केल्या आहेत त्या एकतर्फी बदलाच्या स्वरूपातील असून ग्राहकांवर अन्याय करणाऱ्या आहेत, असेही पत्रात म्हटले आहे.