संसदेचे हिवाळी अधिवेशन शुक्रवारपासून सुरु झाले. पहिल्याच दिवशी राज्यसभेत विरोधकांनी गोंधळ घातला. मात्र हिवाळी अधिवेशनादरम्यान गोंधळ घालणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिली आहे. हिवाळी अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयके येणे अपेक्षित आहे. तसेच चर्चा आणि वाद यातून मार्ग निघू शकतो. गोंधळ घालणे योग्य नाही असे माझे मत आहे असेही नक्वी यांनी म्हटले. कोणत्याही प्रकारचा गोंधळ घातला जाणे चूक आहे तो टाळला जाणे चांगले असेही नक्वी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रधानसेवक म्हणून खूप चांगले काम करत आहेत. तेव्हापासून ठराविक मुद्द्यांवर चर्चा घडवून आणलीच गेली पाहिजे याची सक्ती नाही. यूपीएच्या काळात भ्रष्टाचार आणि दहशतवाद बोकाळला त्यामुळे या दोन मुद्द्यांवर चर्चा करणे हा अधिवेशनांसाठीचा अपरिहार्य भाग होता. आता या मुद्द्यांवर सरकारकडून ठोस निर्णय घेतले जात आहेत. तसेच या गोष्टी नियंत्रणातही आणल्या जात आहेत.  त्यामुळे हे मुद्दे चर्चिले जात नाहीत. विरोधकांच्या हाती आता ठोस असा मुद्दा उरलेला नाही त्यामुळे ते अकारण काहीतरी मुद्दा पुढे करून गोंधळ घालतात असाही आरोप नक्वी यांनी केला.

आज सकाळी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. गुजरात निवडणुकांच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना काँग्रेस नेते गुप्तपणे भेटले होते असे वक्तव्य केले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यासह देशातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठपका ठेवला. नेमके त्यांना काय म्हणायचे आहे हे त्यांनी आता स्पष्ट करायला हवे अशी मागणी आझाद यांनी केली. मात्र विरोधकांनी केलेल्या या टीकेलाही नक्वी यांनी उत्तर दिले. येत्या १८ डिसेंबरलाच काँग्रेसला याचे उत्तर मिळेल असा टोला नक्वी यांनी लगावला.