बोस्टन मॅरेथॉन बॉम्बस्फोटातील दोन संशयित आरोपी हे मूळचे चेचेनचे असून ते भाऊ असल्याचे येथील प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. दरम्यान, दोघा संशयितांपैकी एक गोळीबारात ठार झाला असून, दुसऱ्याच्या शोधासाठी अधिकाऱ्यांनी शहराची नाकाबंदी करण्याचे आदेश दिले आहेत. या संशयित आरोपींना पकडण्यासाठी शुक्रवारी भीषण थरारनाटय़ घडले. मॅसॅच्युसेट तंत्र संस्थेच्या संकुलात या संशयितांसमवेत शुक्रवारी पहाटे भीषण चकमक झाली. या चकमकीत तामेरलॅन सारनेव्ह (२६) हा संशयित ठार झाला. दुसऱ्या संशयितास अटक करण्यासाठी नऊ हजार पोलिसांचा ताफा वॉटरटाऊन शहर पिंजून काढत होता. बोस्टन शहरातील तमाम नागरिकांनी घराबाहेर न पडता आपापल्या ठिकाणीच रहावे, असे आवाहन पोलीस आयुक्त एड डेव्हिस यांनी केले आहे. तामेरलॅन सारनेव्ह हा पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीच्या वेळी भरधाव गाडीखाली सापडून ठार झाला.
फरारी असलेल्या संशयिताचे नाव झोखर सारनेव्ह (१९) असे असून किरगिझस्तानात त्याचा जन्म झाला असल्याचे एनबीसीने म्हटले आहे. त्याच्याकडे मॅसॅच्युसेट येथील वाहनचालकाचा परवाना आहे. झोखर सारनेव्ह हा कोठेही लपून बसला असेल या संशयामुळे त्याला पकडण्यासाठी बोस्टन शहराच्या वॉटरटाऊन या उपनगरातील एका भागाची पोलिसांनी पूर्णपणे नाकेबंदी केली आहे. शहरातील लाखो लोकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून झोखरला पकडण्यासाठी निष्णात असे नेमबाजही तैनात करण्यात आले आहेत. या परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे स्थगित करण्यात आली असून हवाई वाहतूकही नियंत्रित करण्यात आली आहे. आणखी खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील सर्व शाळा आणि विविध विद्यापीठांमधील महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली आहेत. वॉटरटाऊनमधील जनतेने घरातून बाहेर पडू नये आणि गणवेशातील पोलीस असल्याची खात्री केल्याशिवाय घराचा दरवाजा उघडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
झोखर सारनेव्हचा कसून शोध घेण्यासाठी वॉटरटाऊन शहरात असंख्य पोलीस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रचंड धावपळ करीत होते. एफबीआयने या दोघांची छायाचित्रे जारी केल्यानंतर अनेक नाटय़पूर्ण घडामोडी घडल्या. या भागात रशियन भाषा बोलणाऱ्यांची संख्या मोठी असून संशयित आरोपी चेचेनचे असल्याचे उघड झाल्यानंतरही घडामोडींना एकच वेग आला. सुमारे पाच तासांच्या थरारनाटय़ानंतर एफबीआयने काही चित्रे प्रसारीत केली. या दोघांमधील तरुण संशयित आपल्या पाठीवरील बॅग ठेवत असल्याचे एका व्हिडीओमध्ये दिसत होते. हाच इसम दहशतवादी असून मॅरेथॉनमधील स्पर्धकांना ठार मारण्यासाठीच तो आला असावा, असा संशय आयुक्त एड डेव्हिस यांनी व्यक्त केला.
तामेरलॅन सारनेव्ह आणि झोखर सारनेव्ह हे दोघे भाऊ गेली अनेक वर्षे अमेरिकेत वास्तव्यास होते. बोस्टनमधील घटनेनंतर चेचेनच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचे तसेच झोखर सारनेव्ह याचेही इस्लामिक सोशल नेटवर्किंगवर अभिनंदन करण्यात येत होते.