तुम्ही बँकेकडून घेतलेल्या कर्जापैकी १ रुपया परत दिलेला नाही म्हणून तुमचे १३८ ग्रॅम सोने परत करता येणार नाही असा पवित्रा बँकेने एका कर्जधारकाच्या बाबतीत घेतला आहे. चेन्नईत ही घटना घडली आहे. बँकेने घेतलेल्या या भूमिकेविरोधात कर्जधारकाने मद्रास हायकोर्टात धाव घेतली आहे. आपल्या याचिकेत या कर्जधारकाने असाही दावा केला आहे की मी बँकेकडे तारण ठेवलेले सोने सुरक्षित नसावे म्हणूनच बँकेने मला १ रुपया बाकी असूनही माझे तारण सोने परत केलेले नाही.

सी कुमार असे कर्जधारकाचे नाव आहे. सी कुमारने कांचीपुरम सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँकेच्या पल्लावरम शाखेकडून सोने तारण ठेवून कर्ज घेतले. सी कुमारने एकूण १३८ ग्रॅम सोने तारण ठेवले आणि त्याबदल्यात साडेतीन लाख रुपयांची रक्कम कर्ज म्हणून घेतली. त्यानंतर गेल्या पाच वर्षांत त्याने हे कर्ज फेडलेही. मात्र १ रुपया बाकी असल्याने त्याचे सोने १३८ ग्रॅम सोने परत करण्यास नकार दिला आहे. ‘इंडिया टुडे’ने या संदर्भातले वृ्त्त दिले आहे.

२०१० मध्ये याचिकाकर्ते सी कुमार यांनी कांचीपुरम सेंट्रल को. ऑप. बँकेकडून १ लाख २३ हजारांचे कर्ज घेतले. तेव्हा त्यांनी १३१ ग्रॅम सोने तारण ठेवले होते. त्यानंतर त्यांनी एकूण १३८ ग्रॅम सोने तारण ठेवत आणखी १.६५ लाखांचे कर्ज घेतले. २८ मार्च २०११ ला सी कुमार यांनी १ लाख २३ हजारांचे कर्ज व्याजासहीत फेडून आपले १३१ ग्रॅम सोने सोडवले. त्यानंतर काही कालावधी गेल्यावर त्यांनी पुढची दोन कर्जेही व्याजासहीत फेडली. तरीही बँकेने तुमचा १ रुपया बाकी आहे असे सांगत उर्वरित तारण सोने देण्यास नकार दिला.

यानंतर सी कुमार यांनी कोर्टात धाव घेतली. सी कुमार यांचे वकील एम सत्यन यांनी कोर्टात बाजू मांडली. त्यांनी हे स्पष्ट केले की सी कुमार यांनी वारंवार बँकेचे कर्ज फेडले असल्याचे सांगत उर्वरित सोन्याची मागणी केली. तरीही त्यांना ते परत देण्यात आलेले नाही. तुमचा १ रुपया फेडणे बाकी आहे म्हणून तु्म्हाला सोने मिळणार नाही असाच पवित्रा बँकेने घेतला आहे. त्यानंतर सी कुमार यांनी कोर्टात धाव घेत आपले उर्वरित तारण सोने सुरक्षित नसल्याचे म्हणत या प्रकरणी न्याय मिळावा म्हणून याचिका दाखल केली आहे.