चिदम्बरम यांचा केंद्र सरकारला सवाल

नवी दिल्ली : राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) प्रक्रियेचा बांगलादेशवर परिणाम होणार नाही असे आश्वासन भारताने दिले आहे, मात्र ज्या १९ लाख लोकांची नावे आसाममधील एनआरसीच्या अंतिम यादीतून वगळण्यात आली आहेत त्यांचा प्रश्न केंद्र सरकार कशा पद्धतीने हाताळणार आहे, असा सवाल माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी सोमवारी केला.

आसाममधील एनआरसीमधून ज्या १९ लाख लोकांना वगळण्यात आले आहे ते अनिश्तितेच्या, चिंतेच्या आणि नागरी व मानवी हक्क नाकारलेल्या स्थितीत किती काळ राहणार आहेत, असा सवालही चिदम्बरम यांनी केला आहे. देश म. गांधीजींच्या मानवतावादाचे पालन करतो त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

एनआरसी ही जर कायदेशीर प्रक्रिया असेल तर ज्या १९ लाख लोकांची नावे वगळण्यात आली आहेत त्याबाबत कायदेशीर प्रक्रिया कशी पूर्ण करणार, असे चिदम्बरम यांनी आपल्या कुटुंबीयांना त्यांच्या वतीने ट्विट करण्यास सांगितले आहे.

एनआरसी प्रक्रियेचा बांगलादेशवर परिणाम होणार नाही असे आश्वासन जर त्या देशाला देण्यात आले आहे तर भारत १९ लाख लोकांचा प्रश्न कसा हाताळणार, असे त्यांनी ट्विट केले आहे. आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचारप्रकरणी चिदम्बरम हे ५ सप्टेंबरपासून तिहार कारागृहात आहेत.