निर्मोही आखाड्याचे संत आणि रामजन्मभूमी वादातील सर्वात जुने पक्षकार महंत भास्कर दास यांचे शनिवारी निधन झाले. ८८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. अयोध्येतील तुलसीदास घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिली आहे. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. शनिवारी त्यांची प्रकृती आणखी खालावली. गेल्या चार दिवसांपासून महंत भास्कर दास यांच्यावर फैजाबाद हर्षण हार्ट संस्थेमध्ये उपचार सुरू होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे २.३० च्या सुमारास महंत भास्कर दास यांना पक्षाघाताचा झटका आला. वार्धक्यामुळे ते हा झटका सहन करु शकले नाहीत. त्यांच्या नाडीचा वेग मंदावत गेला. त्यानंतर पहाटे ३ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती दास यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर अरूण कुमार जयस्वाल यांनी दिली.

महंत भास्कर दास यांनी १९५९ मध्ये अयोध्येतील रामजन्मभूमीवर दावा सांगणारी याचिका दाखल केली होती. त्याचमुळे या प्रकरणातले ते सर्वात जुने पक्षकार होते. मुस्लिम पक्षकार हाशिम अन्सारी यांच्यासोबत भास्कर दास यांचे चांगले संबंध होते. रामजन्मभूमी आणि बाबरीचा वाद असूनही या दोघांमधील स्नेह कायम होता. काही दिवसांपूर्वीच हाशिम अन्सारी यांचेही निधन झाले आहे.