मायक्रोसॉफ्टने गेल्या महिन्यात विंडोज एक्सपीची मदत काढून घेतल्याचे पडसाद जगभरात उमटू लागले आहेत. चीनने तर सुरक्षेचे कारण पुढे करीत सर्व सरकारी कार्यालयांमधील संगणकांमध्ये विंडोज ८ न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारतर्फे खरेदी करण्यात आलेल्या सर्व संगणक, लॅपटॉप, टॅबलेटमध्ये विंडोज ८ व्यतिरिक्त इतर प्रणाली वापरण्याबाबत चीन सरकारने निवेदन जाहीर केले आहे.
चीनने सरकारी कार्यालयांमधील संगणकांमध्ये विंडोज ८ चा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र खासगी वापरातील संगणकांबाबत त्याचा परिणाम झाला नसल्याचे क्झिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
चीनमधील सरकारी कार्यालयामध्ये मोठय़ा प्रमाणात मायक्रोसॉफ्टच्या संचालन प्रणालीचा वापर करण्यात येतो. मात्र गेल्या महिन्यात मायक्रोसॉफ्टने गेल्या महिन्यात १३ वर्षांपासून विंडोज एक्सला असलेला पाठिंबा काढून घेतला आहे. तसेच संबंधित संचालन प्रणाली वापरणाऱ्यांनी आपल्या संगणकावरील प्रणाली सुधारित करून घ्यावी, अन्यथा शक्य असल्यास नवीन संगणक घ्यावा, असा सल्ला दिला आहे.
मायक्रोसॉफ्टच्या निर्णयानंतर सरकारी यंत्रणांच्या सुरक्षेला असणाऱ्या धोक्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे चीन सरकारने स्पष्ट केले. मायक्रोसॉफ्टच्या निर्णयामुळे सरकारी संगणक हॅक होण्याची सर्वाधिक भीती निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.
चीनमध्ये विंडोज ८ ची किंमत ८८८ युआन (१४२ डॉलर) इतकी आहे. त्यामुळे विंडोज ८ हे महागडे असून त्याचा वापर करायचा झाल्यास सरकार खर्चात मोठय़ा प्रमाणात वाढ होईल, असे चीनच्या सरकारी अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
दरम्यान, अमेरिकेतील खासगी कंपन्यांची संकेतस्थळे ‘हॅक’ करणाऱ्या चिनी लष्करातील पाच सैनिकांना अमेरिकेच्या न्याय विभागाने दोषी ठरविले. चिनी कंपन्यांना फायदा व्हावा यासाठी चिनी लष्करातील सैनिकांनी अमेरिकी कंपन्यांची हेरगिरी केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणानंतर चीनने सायबर क्षेत्रात अमेरिकेबरोबर काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.